टेम्पोच्या अपघातात दोन ठार

संगमनेर – पुणे – नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात झालेल्या अपघातात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्रंबक नाका येथून शासकीय टेम्पो ( एमएच. 15 एबी. 59 ) मधून पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी सकाळी निघाले होते. चालक डी. टी. देवरे टेम्पो चालवित होते.

संगमनेर तालुका हद्दीतील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर कर्जुले पठार शिवारात एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. टेम्पोच्या मागे बसलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. यात अनिल सोपान कोळी व जगन्नाथ पोपट सणधन (दोन्ही राहणार नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस व महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टेम्पोतील मृतांना बाहेर काढण्यात आले. तर गंभीर जखमी झालेले मुज्जाहुद्दीन शेख, रवींद्र मिसाळ, नितीन सोनावणे, डी. टी. देवरे यांना उपचारार्थ संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)