यांगोन (म्यानमार) – रोहिंग्यांच्या समस्यांबाबतच्या वार्तांकनामुळे म्यानमार सरकारने तुरुंगात टाकलेल्या रॉयटर वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांची आज मुक्तता करण्यात आली. या पत्रकारांच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवर मोठे अभियान छेडले गेले होते. त्यानंतर अध्यक्षांच्या माफीच्या आधारे या पत्रकारांना मुक्त करण्यात आले. वा लोन आणि क्वॉ सो ऊ अशी या दोघांची नाअवे असून यांगोनच्या तुरुंगाबाहेर पडताच त्यांना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. वा लोन याने जगभरातील लोकशाहीप्रेमी जनतेला धन्यवाद दिले आहेत. तसेच सुटका झाल्यामुळे आपण बातमीदारीच्या आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार असल्याचेही म्हटले आहे.
म्यानमारच्या सरकारने या दोन धाडसी पत्रकारांची सुटक केल्याब्द्दल रॉयटर वृत्तसंस्थेचे प्रमुख संपादक स्टीफन ऍडलर यांनी आनंद व्यक्त केला आहे. सप्टेंबर 2017 मध्ये रखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांच्या हत्याकांड आणि त्यानंतर तब्बल साडे 7 लाख रोहिंग्यांना हुसकावून लावल्याबाबतचे वृत्त या दोघांनी प्रसिद्धीस दिले होते. लोन आणि ऊ या दोघांना 2017 च्या डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अधिकृत गोपनीय कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या दोघांनी तब्बल 511 दिवस तुरुंगात काढले आहेत.
शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित अणि नागरी हक्क विषयक नेत्या आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून म्यानमारमध्ये प्रसिद्धी माध्यमांवर किती कठोर निर्बंध आहेत, याचे एक उदाहरणच यानिमित्ताने जागतिक समुदायाला दिले गेले.