महाराष्ट्रातील 13 कारागृहात दोनशे पट कैदी 

देशात 52842 कैदी अतिरिक्त ः रोहा तुरूंगातील संख्या बाराशे पट 
वंदना बर्वे 
नवी दिल्ली  भारतीय बॅंकांना हजारो कोटीचा चूना लावून पसार झालेल्या उद्योगपतींना भारतात परत आणण्याची मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने छेडली आहे. मात्र, या गुन्हेगारांना ठेवायचे तरी कोणत्या तुरूंगात? असा प्रश्न सरकारला पडला आहे. कारण, देशातील 1401 तुरूंग केवळ हाउसफुल्ल नव्हे; तर ओव्हरफ्लो झालेले आहेत. महाराष्ट्रातील 13 जेलमध्ये दोनशे पट अतिरिक्त कैदी आहेत. यातील रोहा तुरूंगात बाराशे पट अतिरिक्त कैदी आहेत.
गृह मंत्रालयातील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 1401 तुरूंगाची क्षमता 3 लाख 66 हजार 781 कैद्यांची आहे. मात्र, यात 4 लाख 19 हजार 623 कैद्यांना कोंबण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तुरूंगाची क्षमता 26 हजार 303 कैद्यांची आहे. परंतु, सध्या 29 हजार 657 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अर्थात, 3 हजार 354 कैदी अतिरिक्त आहेत.

महत्वाचे म्हणजे, राज्यातील 13 तुरूंगामध्ये क्षमतेपेक्षा दोनशे पट कैदी अतिरिक्त आहेत. महाराष्ट्रातील तुरूंगाची क्षमता 24584 पुरूष आणि 1719 महिला असे 26303 एवढी आहे. परंतु, सध्या 28321 पुरूष कैदी आहेत. महिला कैद्यांची संख्या 1336 आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील जेलमध्ये 52 हजार 842 कैदी अतिरिक्त आहेत. यातील सर्वात जास्त कैदी उत्तरप्रदेशातील तुरूंगात आहेत. यूपीतील तुरूंगाची क्षमता 52 हजार 572 कैद्यांची आहे. मात्र, येथे 88 हजार 747 कैद्यांना कोंबण्यात आले आहे. थोडक्‍यात, 36175 कैदी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. छत्तीसगडमधील तुरूंगात 10 हजार 110 आणि राजधानी दिल्लीतील तुरूंगात 7933 अतिरिक्त कैदी शिक्षा भोगत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातील बॅंकांना नऊ हजार कोटी रूपयाचा चुना लावून परदेशात पसार झालेले आरोपी मद्य सम्राट विजय माल्या यांना भारतात आणण्याची पूर्ण व्यवस्था सरकारने केली आहे. तुरूंगातील अवस्था लक्षात घेता माल्या कर्ज परत करायला तयार आहेत. मात्र, भारतात परत येण्याची त्यांची इच्छा नाही. अगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्याचा आरोपी मिशेलला भारत आणण्यात आले आहे. आणखी काही आरोपींचे प्रत्यर्पन झाले आहे. मात्र, विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या हाय-प्रोफाईल कैद्यांना ठेवायचे तरी कोणत्या तुरूंगात? असा प्रश्न सरकारला पडला आहे.

विजय माल्या यांच्या प्रत्यर्पनाचा खटला लंडनच्या वेस्टमिनिस्टर सत्र न्यायालयात सुरू असताना त्यांच्या वकिलाने भारतातील तुरूंगातातील अस्वच्छता आणि घाणेरडे वातावरण आरोग्याला अपायकारक असल्याचा युक्तीवाद केला होता, हे येथे उल्लेखनीय. गृह मंत्रालयातील सूत्राने नाव न छापण्याच्या दिलेल्या माहितीनुसार, भारतात 1401 तुरूंग आहेत. यापैकी 149 तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा दोनशेपट कैदी अतिरिक्त असल्याची बाब नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या 2015 च्या अहवालातून उघडकीस आली आहे.यातील महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या दोन तुरूंगात 1200 पट कैदी अतिरिक्त आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा उप तुरूंगात सध्या 36 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. जेव्हाकी या तुरूंगाची क्षमता फक्त तीन कैद्यांची आहे. तामिळनाडूच्या सत्यमंगलम उप-जेलमध्ये 200 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. आणि या तुरूंगाची क्षमता फक्त 16 कैद्यांची आहे.

महाराष्ट्रात 154 तुरूंग महाराष्ट्रात आहेत. यात सेंट्रल जेल (9) डिस्ट्रीक्‍ट जेल (28), डिस्ट्रीक्‍ट उप-जेल (100), महिलांची जेल (1), बाल गुन्हेगारांचातुरूंग (1), ओपन जेल (13), स्पेशल जेल (1) आणि अन्य (1) चा समावेश आहे. केंद्रीय तुरूंगाची क्षमता (14841), जिल्हा तुरूंग (6938) आणि उप तुरूंग (2361) अशी सर्वतुरूंगाची एकूण क्षमता 26303 कैद्यांची आहे आणि सध्या 29657 कैदी यात आहेत.

संपूर्ण देशात 341318 पुरूष कैद्यांची क्षमता आहे आणि सध्या 401789 पुरूष कैदी आहेत. महिला कैद्यांची संख्या 25463 क्षमता आहे. यात 17834 महिला कैदी आहेत. देशपातळीचा विचार केला तर एकूण क्षमता 366781 कैद्यांची आहे आणि 419623 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्यामुळे सोयी-सुविधा अपुाया पडतात. यामुळे कैद्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होता. अनेक कैदी एचआयव्ही किंवा अन्य आजाराने ग्रस्त असल्यामुळे अन्य कैद्यांनाही त्याची लागण होण्याची भीती असते.अशात, कैद्यांना आरोग्य, टॉयलेट अशा किमान सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून सर्वोच्चन्यायालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुध्दा याबाबतीत फार गंभीर आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून वेळोवळी तुरूंगाची पाहणी करून प्रशासनाला आवश्‍यक दिशानिर्देश दिले जातात. आयोगने नागपूर सेंट्रल जेल, नाशिक सेंट्रल जेल,मुंबई सेंट्रल जेल, येरवडा आदी तुरूंगाची पाहणी केली आहे. नियमानुसार, दहा कैद्यांमागे एक टॉयलेट असायला पाहिजे. परंतु, राज्यातील काही तुरूंगात 16 कैद्यांमागे एक टॉयलेट असल्याची बाब आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) डॉ. ए. एस. आनंदयांनी 2013 मध्ये केलेल्या पाहणी अहवालात अधोरेखित केली होती. जेल रिफॉर्मशीसंबधित अखिल भारतीय समितीने आता सहा कैंद्यांमागे एक टॉयलेट असायला पाहिजे, अशी शिफारस केली आहे. गृह मंत्रालयातील सूत्रानुसार, भारतातील विविध तुरूंगात 2353 विदेशी कैदी शिक्षा भोगत आहेत. यात 97 कैदी हे पाकिस्तानी आहेत. तर 113 पाकिस्तानी विचाराधीन कैदी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)