डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यावर डागली तोफ
कृष्णाच्या शेती खात्याची देदीप्यमान कामगिरी
साखर कारखान्यांना ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी मोठ्या प्रमाणात सोसावी लागत असल्याने आर्थिक फटका बसत असतो. पण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाने गेल्या 4 वर्षांत दैदीप्यमान कामगिरी करत ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी शून्य ठेवली आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान टळण्यास मदत झाली असून, कारखान्याच्या शेती विभागाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार ना. डॉ. अतुल भोसले यांनी काढले.
कराड – कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याची घाई झालेल्या माजी चेअरमन अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांचा सहकाराचा अभ्यास कच्चा आहे. सहकार कायद्यातील 97 व्या घटना दुरुस्तीनुसार कृष्णा कारखान्याचे संचालक कार्य करीत असताना, विरोधक मात्र राजकीय हेतूने मुद्दे उपस्थित करून सभासदांची दिशाभूल करण्याची धडपड करत आहेत. या दोन्ही माजी चेअरमनचा हा आटापिटा कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठी सुरू आहे, अशी टीका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूक करार शुभारंभ व सभासद मोफत साखर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक गुणवंतराव पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, एम. के. कापूरकर उपस्थित होते.
सहकार कायद्यातील 97 व्या घटना दुरूस्तीनुसार कारखान्याकडून अक्रियाशील सभासदांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांनी आरोपांची राळ उडविली असताना त्यांना रोखठोक उत्तर देण्याचे काम डॉ. अतुल भोसले यांनी केले. सहकार कायद्यानुसार सभासदांनी संस्थेशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे. मात्र अनेक सभासद कारखान्यास अनेक वर्षांपासून ऊस पुरवठा करत नाहीत. अशा सभासदांना कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीसा पाठविल्या असता विरोधकांनी मात्र पत्रकार परिषद आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे सभासदांचा मताधिकार डावलला जात असल्याचा कांगावा सुरू केला आहे. कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानेच हे दोन्ही माजी चेअरमन आटापिटा करत आहेत. सूज्ञ सभासद मात्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, स्थिरता लाभली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. कामगारांचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात निश्चित सोडविले जातील. कारखान्याने तोडणी यंत्रणेत पारदर्शकता आणली असून, शेतकी खात्याने आधुनिक नोंदणी यंत्रणेचा वापर करत तोडणी यंत्रणेत सुसूत्रता आणली आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याकडे ऊस घालण्यासाठी सभासदांचा ओढा दिसून येत आहे.
प्रारंभी सभासदांना मोफत साखरेचे वाटप, तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. सूर्यकांत दळवी यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुकेश पवार, पी. डी. राक्षे, सुहास घोरपडे, प्रतापसिंह नलवडे, प्रकाश सूर्यवंशी, अवधूत रेणावीकर, पंकज पाटील, अरूण पाटील, डी. व्ही. कुंभार, रवींद्र देशमुख, अजय दुपटे, शिवाजी बाबर, जी. बी. मोहिते, विजय मोहिते, वाहतूक अधिकारी गजानन प्रभुणे, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख यांच्यासह तोडणी वाहतूकदार, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.