दोन दिवसआधीच पाणीकपात

कोथरूडसह पेठांमध्ये एकच वेळ पाणी

पुणे – शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस वितरण यंत्रणेत बदल करावा लागणार आहे. यामुळे पुढे तीन ते चार दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे दोन वेळा सुरू असलेला कोथरूड आणि शहरातील मध्यवर्ती पेठांसह, महर्षिनगर आणि मुकुंदनगरच्या काही भागात पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा शुक्रवारपासूनच बंद केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून शहरात येत्या सोमवारपासून एकवेळ पाणी देण्यात येणार आहे. तर हडपसरसह काही उपनगरांत दिवसाआड पाणी दिले जाणार आहेत. त्यानुसार काही भागांत पाच तास, तर काही भागात अडीच तासच पाणी दिले जाणार आहे. याचे वेळापत्रक महापालिकेने जाहीरही केलेले आहे. त्यामुळे कपातीला आणखी काही दिवस असल्याचे गृहीत धरून या भागातील नागरिकांनी दैनंदिन कामे हाती घेतली. मात्र, अचानक पाणी न आल्याने दोन वेळ पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शहरात दोन वेळा पाणीपुरवठा केल्याचे महापालिका सांगत असली, तरी पर्वती जलकेंद्रावरून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मध्यवर्ती पेठा आणि कोथरूड भागातच सकाळी आणि सायंकाळी पाणी दिले जाते. उर्वरित भागात एक वेळच पाणी होते. मात्र, आता पेठा आणि कोथरुडचा एकवेळ पाणीपुरवठा सोमवारपासून बंद केला जाणार आहे. त्यामुळे रिकाम्या जलवाहिनीत अचानक पाणी असल्यास अथवा वितरणात काही व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तसेच पाणी सोडण्याचे सर्वच वेळापत्रक बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वितरणात समस्या येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने पेठा आणि कोथरूडमध्ये 2 वेळेस दिले जाणारे पाणी शुक्रवारपासूनच कमी करण्यास सुरूवात केली आहे.

…म्हणून घेतला निर्णय

सोमवारपासून एकवेळ पाणी सुरू केल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा पुढे 3 ते 4 दिवस विस्कळीत होणार आहे. त्यातच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दिवाळीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास आरडाआरोड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अडचण नको, म्हणून पाणीपुरवठा विभागाने सोमवारपासूनच्या नियोजनाची तयारी 3 दिवस आधीच सुरू केली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला असून ही बाब आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)