पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा

सदस्यांचा स्थायी समितीत ठराव : याआधीही झाली होती मागणी

पुणे – पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण थांबवावे असा ठराव सदस्यांनी स्थायी समितीकडे दिला आहे. याआधीही सदस्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात मागणी केली होती. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

पिण्याच्या पाण्याची लाइन फोडून त्यातून अनधिकृतरित्या पाणी रस्त्यांसाठी वापरले जात असल्याचे वृत्त दै. “प्रभात’ने दिले होते. कॉंक्रिटचे रस्ते केल्यानंतर त्यात आळे करून त्यामध्ये पिण्याचे पाणी दिले जात असल्याचे दिसून आले होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना आणि भविष्यात ही टंचाई भीषण स्वरूप धारण करणार हे दिसत असताना अशाप्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी केली जात असल्याचे उघड झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी स्थायी समितीमध्ये कॉंक्रिट रस्त्यांची कामे बंद करावीत, असा प्रस्ताव दिला आहे.

यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यसरकारनेही दुष्काळ जाहीर केला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला भरपूर पाणी लागते. त्यामुळे गल्लीबोळ कॉंक्रिटीकरणाची कामे थांबवावीत, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

लोकसभेची आचारसंहिता असल्याने या प्रस्तावाचा विचार केला जाणार का, हा प्रश्‍न आहे. परंतु पाण्यासंदर्भातील निर्णय हे आचारसंहितेमध्ये अडकवून ठेवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)