400 वर्षे जुने आई तुळजाभवानी मंदिर

वानवडी येथील केदारीनगर परिसरातील आई तुळजाभवानी मंदिर पुरातनकालीन आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्षे जुने असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पाचशे चौरस फूट जागेत काळ्या पाषाणात त्याकाळी बांधलेले हे मंदिर आजही भक्‍कम आहे. गाभाऱ्यात आई तुळजाभवानीच्या पुरातन पादुका असून भिंतीवर कोरीव मूर्ती आहेत. अनेक वर्षांपासून मंदिर धुळखात बंद अवस्थेत होते. मंदिराच्या सभोवताली उच्च गृहप्रकल्प झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांशिवाय कोणाला या मंदिराबद्दल माहिती नव्हती. भारतीय इतिहास संशोधक महामंडळ व काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे मंदिर खुले करण्यात आले.

मंदिरात विशिष्ट असा आकार असलेली काळ्या दगडगोट्यातील स्वयंभू मूर्ती आहे. आषाढ महिन्यात या मूर्तीला मोठा मान असतो. दर्श अमावस्येला वानवडी ते रामटेकडी देवीचा गाडा वाजवत गाजत नेला जातो. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते. तसेच, पहाटे पूजा केली जाते. या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सुवासिनींकडून हळदी-कुंकवाने देवीचा मळवट भरला जातो. साडीचोळी अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. नवरात्र काळात या परिसरात शेकडो भाविक नारळ व नैवेद्य घेऊन दर्शनासाठी येतात. ढोल-ताशांनी मंदिराला माळेप्रमाणे वेढे मारले जातात. त्यानंतर कोजागरी पौर्णिमेला वानवडी गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. तसेच, मंदिराच्या शिखरावर शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी तलवार देत असलेली प्रतिकृती शिल्पकाम केलेले आहे. मंदिराचा गाभारा बंदिस्त असून काळ्या पाषाणात कोरीव शिल्पकाम केलेली एकमेव स्वयंभू अशी मूर्ती आहे.

– उत्कर्ष खवले

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here