दोषींना वाचविण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

पुणे – कोंढवा आणि आंबेगाव दुर्घटनाप्रकरणी महापालिकेकडून केवळ बांधकाम व्यावसायिक आणि परवानाधारक आर्किटेक्‍टवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, पण याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांनी केला आहे. मुख्यसभेत या दुर्घटनेवर चर्चा होणे गरजेचे असताना, सभा तहकूब केल्याचा दावा बराटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बराटे म्हणाले, “या दोन्ही घटनांमध्ये 21 जणांचा जीव गेला आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर बिल्डर, आर्किटेक्‍ट तसेच इतरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रकाराला महापालिका तसेच बांधकाम विभागाचे कर्मचारीही जबाबदार आहेत. या ठिकाणी खोदाई होत असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई अपेक्षित आहे. या बाबतच सर्व विरोधीपक्षांकडून मुख्यसभेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दुर्घटनेप्रकरणी भाजपने असंवेदनशिलता दाखवत सभा तहकूब केली.त्यामुळे भाजप सरळसरळ प्रशासनाला वाचविण्यासाठी या विषयावर चर्चा होऊ देत नसल्याचे दिसत आहे.’

अभूतपूर्व गोंधळातच मुख्यसभा तहकूब
बुधवारी महापालिकेची मुख्यसभा सुरू होताच विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी भिंत दुर्घटना, खड्डे तसेच प्रशासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सभा तहकूब न करता या वर चर्चा व्हावी, तसेच प्रशासनाने खुलासे करावेत अशी मागणी करण्यात आली. मात्र, सीमाभिंत दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून ही सभा तहकूब करण्यात आली. यावेळी विरोधकांनी भाजपविरोधात घोषणा देत चर्चेला सत्ताधारी घाबरत असल्याचा आरोपही केला. मात्र, त्यानंतरही सभा तहकूब करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)