ब्रेकफेल झालेल्या ट्रकखाली सापडलेल्या तरूणाला अग्निशमन दलाकडून जीवनदान

पुणे : कात्रज येथील दत्तनगर चौकात सिमेंटच्या पोत्याने भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा थरार घडला होता. सुदैवाने या घटनेत ट्रकखाली सापडलेल्या एका तरुणाला अग्निशमन दलातील जवानामुळे जीवनदान मिळाले तर, एक तरुणी किरकोळ जखमी झाली.

दत्तनगर येथील चौकात सिमेंटने भरलेला एक ट्रक पावणेतीनच्या सुमारास चालला होता. या ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तरुणी बाजूला रस्त्यावर फेकल्या गेल्याने थोडक्‍यात बचावली. मात्र ट्रक तिची दुचाकी काही मीटर फरफटत घेऊन गेला. दरम्यान रस्त्याच्या कडेने जात असलेला एक तरुण ट्रकच्या धक्‍क्‍याने ट्रकखाली सापडला. तोही ट्रकसोबत थोडा फरफटत गेला. मात्र ट्रकच्या चाकाखाली हौसिंगला तो अडकला. ट्रकही थोड्याच अंतरावर थांबला.

हा अपघात घडला तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. ट्रकखाली अडकलेल्या तरुणाला कसे बाहेर काढायचे हा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. दरम्यान कोथरूड अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण ड्युटी संपवून घरी जात होते. त्यांनी हा प्रकार पहाताच एका नागरिकाच्या मदतीने ट्रकखाली अडकलेल्या तरुणाला पायाला धरून बाहेर काढले. या तरुणाच्या पायाला, हाताला आणि डोक्‍याला गंभीर मार लागला होता. त्याला तातडीने तेथे दाखल झालेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नवले रुग्णालयात दाखल केले.

यासंदर्भात योगेश चव्हाण म्हणाले, ड्युटी संपवून गुजरवाडी येथे घरी जात असताना दत्तनगर चौकात मोठी गर्दी दिसली. यामुळे तेथे धाव घेतली असता अपघाताची घटना दिसली. येथे ट्रकखाली एक तरुण अडकून पडला होता. त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला बाहेर काढणे आवश्‍यक होते. यामुळे एका नागरिकाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू केले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत नसल्याने पायाला धरून त्याला ट्रकच्या मागील बाजूने बाहेर खेचून काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)