तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकारचा ‘प्लॅॅन बी’ तयार

नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज वादग्रस्त तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे. लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक गेले कित्येक दिवस विरोधकांमुळे राज्यसभेत अडकून पडले आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर होईल, अशी आशा आहे. परंतु, हे विधेयक आजही पारित न झाल्यास मोदी सरकारने मंजुरीसाठी ‘प्लॅॅन बी’ तयार केला आहे.

सूत्रांनुसार, राज्यसभेमध्ये सरकार अल्पमतात असल्यामुळे तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर करणे सरकारसाठी अवघड आहे. परंतु, यासाठी सरकार ‘प्लॅॅन बी’ अंमलात आणण्याच्या तयारीत असणार असून तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नाहीतर मोदी सरकार यासाठी अध्यादेश काढेल किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपत्कालीन कार्यकारी आदेश देण्याची शक्यता आहे.

-Ads-

‘मुस्लिम वुमन प्रोटेक्‍शन ऑफ राइट्‌स ऑन मॅरेज बिल’, २०१७ या विधेयकामध्ये विरोधकांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्यानुसार मोदी सरकारने या दुरुस्त्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे विरोधकांचा विरोध काहीसा मावळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

यामध्ये तीन महत्वाच्या दुरुस्त्या सरकारने केल्या आहेत. तिहेरी तलाक मिळालेली पिडीत महिला किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकांनाही तलाकविरोधात एफआयआर नोंदवण्याची परवानगी असेल. शिवाय खटला मागे घेण्यासाठी पीडित महिलेच्या पतीला तडजोड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

तिहेरी तलाक दिलेल्या पतीस तीन वर्षाची अजामीनपात्र शिक्षेची तरतूद या विधेयकात होती. मात्र यावर विरोधकांनी आक्षेप घेत या विधेयकामध्ये जामीनाची तरतूद अशी प्रमुख मागणी केली होती. याही मागणीला मंजुरी देत मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयकात जामिनाची तरतूद केली आहे. परंतु त्या व्यक्तीस जामीन देण्याचा अधिकार स्थानिक पोलिसांना नसून केवळ दंडाधिकाऱ्याकडे असणार आहे. दरम्यान, जामीनाच्या तरतूदीचा समावेश करण्यात आल्यामुळे आता हे विधेयक राज्यसभेमध्येही मंजूर होण्याची शक्‍यता वाढली आहे. शिवाय सत्ताधारी पक्षाकडूनही या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती विरोधी पक्षांना करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)