“जी-2’च्या निमित्ताने मोदी यांची ट्रम्प आणि ऍबे यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा

ब्युनोस आयर्स: “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा केली. यावेळी जगभरातील महत्वाच्या विषयांसह बहुस्तरिय हिताच्या विषयांवरही चर्चा झाली. प्रशांत पॅसिफिक भूभागामध्ये चीनच्या वाढत्या प्रस्थाच्या पार्श्‍वभुमीवर शुक्रवारी संध्याकाळी झालेली ही चर्चा विशेष महत्वाची मानली जात आहे.

सामूहिक तत्वांसाठी भारत यापुढेही काम करत राहिल, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दोन्ही नेत्यांना दिली. “जेएआय’ (“जय’ – जपान, अमेरिका, भारत) ची ही बैठक लोकशाहीच्या तत्वांना समर्पित आहे, असे मोदी यांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही देशांच्या दृष्टीकोनाचे अभिसरण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी या “जय’च्या पहिल्या वहिल्या बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विकासाबाबत समाधान व्यक्‍त केले.

तिन्ही नेत्यांनी या चर्चेदरम्यान संलग्नता, स्थायी विकास, दहशतवादाला विरोध आणि सागरी तसेच सायबर सुरक्षेसारख्या जागतिक पातळीवरील आणि परस्पर हिताच्या सर्व विषयांमधील सहकार्य मिळण्याच्या महत्वावर विशेष भर दिला. इंडो-प्रशांत क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून खुल्या, मुक्‍त, निर्णायक आणि नियमावर आधारीत शांतता आणि सर्व मतभेदांवर शांततापूर्ण तोडगा अपेक्षित असल्याचे मत तिन्ही नेत्यांनी व्यक्‍त केले.

दक्षिण चीन समुद्रामधील हद्दीवरून निर्माण झालेला वाद आणि पूर्व चीन समुद्रात जपानबरोबरच्या वादामध्ये चीन अडकलेला असतानाच ही त्रिपक्षीय चर्चा झाली. ही दोन्ही सागरी क्षेत्रे खनिज, तेल आणि अन्य नैसर्गिक स्रोतांनी समृद्ध असल्याचे मानले जात आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रातील बहुतेक भागावर दावा केला आहे. व्हिएतनाम, फिलीपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवाननेही या सागरी मार्गावर दावा केला आहे. या समुद्रातील अनेक बेटांवर चीनने सैन्य तैनात ठेवले आहे. सागरी मार्गात चीनकडून अडथळे आणले जाऊ नये यासाठी दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेकडून सातत्याने टेहळणी केली जात असते.

पंतप्रधान मोदी यांनी जून महिन्यात सिंगापूरमध्ये झालेल्या शांग्रीला शिखर परिषदेतल्या बीजभाषणामध्ये इंडो-प्रशांत भूभागाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली होती. “इंडो-प्रशांत क्षेत्राकडे भारत रणनिती म्हणून किंवा मर्यादित सदस्यांचा समूह म्हणून पहात नाही. वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणारा गटही करू इच्छित नाही. कोणत्याही अर्थाने कोणत्याही एखाद्या देशाविरोधात याचा विचार आम्ही करत नाही. अशासारख्या भौगोलिक क्षेत्राचा असा विचार केला जाऊ शकत नाही.’ असे मोदी म्हणाले होते.

मोदी, ट्रम्प आणि ऍबे यांनी अन्य देशांना विविध मार्गांनी सहकार्य देण्याचेही मान्य केले. बहुस्तरिय परिषदांमध्ये त्रिस्तरीय औपचारिक बैठकांचे महत्वही या तिघांनी मान्य केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)