सत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना!

अवजड वाहनांमुळे रस्त्याला हानी…
मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले; मात्र साईट पट्ट्या अद्याप भरल्या गेल्या नाही. साईट पट्ट्या आधी भरणे गरजेचे आहे. मात्र भराव टाकलाच नाही. आता रस्त्याची उंची वाढली आहे. मुख्य रस्त्याला साईट पट्ट्यांचा आधार नसल्याने या रस्त्यावरून खाली उतरणाऱ्या आणि रस्त्यावर जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याला हानी पोहोचत आहे. याशिवाय रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

कामशेत – नाणे मावळासह परिसरातील 70 गावांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या कामशेतला वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणानंतर साइड पट्‌टे भरले गेले नाहीत. नित्याची वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, कचरा समस्यांमुळे कोट्यवधींचा रस्ता होऊनही मुख्य बाजारपेठेच्या नशिबी यातना दिसून येत आहे. साइड पट्ट्यांच्या समस्येमुळे चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यातच सांडपाणी साचत असल्याने दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामशेत शहरातील मुख्य रस्ता, वडगाव, लोणावळा शहरातील वलवण आदी तीन ठिकाणच्या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. कामशेतमधील मुख्य रस्त्याचे काम जानेवारी महिन्यात सुरू झाले. कामशेत पोलीस ठाणे ते खामशेत फाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पवनानगर फाटा असे कामाचे स्वरूप होते. या कामात प्रथम मुख्य रस्त्यावर बीम, कार्पेट व सीलकोट याप्रमाणे काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यात आले.

मुख्य रस्त्याच्या काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे रस्त्याची वारंवार दुरवस्था होते. आता सखल भागात सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पवनानगर फाटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणपती चौक आणि शायरी भागातील काही रस्ता या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहेत. हे काम दोन आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले असूनही साईट पट्ट्या अद्यापही भरलेल्या नाहीत.

रस्त्याच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्याची उंची वाढली. त्यातच साईट पट्ट्या न भरल्याने वाहने रस्त्याच्या खाली उतरवता येत नाही. याचा वयोवृद्ध नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहने रस्त्याच्या खाली जात नसल्याने अनेक जण रस्त्यावर वाहने पार्किंग करतात. त्यामुळे रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम करणारे ट्राफिक वार्डन, होमगार्ड यांना धनदांडग्या नागरिकांच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. डांबरी रोड आणि सिमेंट रोड ज्या ठिकाणी जोडले जात आहेत. तिथे कमी अधिक उंचीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

कामशेत शहर हे मध्यवर्ती शहर असल्याने सुमारे 70 गावांमधील नागरिकांचा येथे राबता असतो. खरेदी व तत्सम कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांसह दुचाकी, चारचाकी, व्यापाऱ्यांची मालवाहतूक वाहने येथे मोठी गर्दी होत असते. गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणांमुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यात शहरातील मुख्य रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने कोंडीत आणखी भर पडली. तसेच वाहनचालक व पादचारी यांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात कारवाई करताना वाहतूक पोलीस आणि वार्डन यांची पुरती दमछाक होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राकेश सोनवणे म्हणाले की, कामशेत बाजारपेठेतील रस्त्यालगच्या साईटपट्ट्या भरण्याचे काम सुरू केले असून, येत्या चार दिवसांत ते पूर्ण होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)