ट्रेंड हँगिंग गार्डनचा

महानगरात राहणाऱ्या लोकांकडे बागबगीचा करायला पुरेशी जागा आणि वेळही नसतो. अनेकांना बागकामाची हौस असते, मात्र जागेअभावी आणि वेळेअभावी ते छंद पाळू शकत नाही. कारण कामातील व्यग्रतेमुळे कार्यालयातून घरी परतल्यानंतर बगिचामध्ये फेरफटका मारण्याचा विचारही ते करू शकत नाही. अशा स्थितीत काही जण मार्ग काढतात आणि घरातील व्हरांड्यात किंवा गॅलरीत कुंड्या आणून काहीप्रमाणात बागकामाची हौस भागवतात. अशा वेळी कुंड्या खाली ठेवण्याऐवजी वर अडकवल्या तर आपल्या बागकामाला आणखीच बहार येऊ शकते. गॅलरीत हॅंगिंग गार्डनची रचना केल्यास काही अंशी मनाला शांती मिळेल. जर आपणही घराला असा नवीन लूक देण्याचा विचार करत असाल तर बाल्कनी, ड्रायबाल्कनी किंवा एखाद्या भिंतीलगत कुंडी अडकवून हॅगिंग गार्डन अस्तित्वात आणू शकता. सर्व कुंड्या एकाच ओळीत ठेवण्याऐवजी वर-खाली अडकवल्या तर हॅगिंग बास्केट गार्डनला अनोखा लूक मिळेल.

जागेची निवड : ज्या ठिकाणी हॅगिंग बास्केटची रचना करायची आहे, ती जागा सर्वबाजूनी सुरक्षित असणे आवश्‍यक आहे. सूर्याची किरणे किंवा थंड वारे आत येणाऱ्या ठिकाणी हॅंगिंग गार्डनची रचना करू नये. या बास्केटसाठी सर्वात चांगली जागा म्हणजे सेमी शेल्टर एरिया होय. यासाठी बाल्कनी किंवा एखाद्या भिंतीच्या कोपऱ्याची निवड करू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने डोक्‍यावर किंवा डोळ्याच्या समतल पातळीवर बास्केट अडकवण्याचा विचार करावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बास्केट आकर्षक असावे : साधारण, विविध आकाराच्या कुंड्या आपण गॅलरीत, व्हरांड्यात अडकू शकता किंवा एखादे आकर्षक डिझायनची रचना केलेल्या कुंड्या, बास्केटची निवड करू शकता. कोको फायबर, लोखंड, केळीच्या पानापासून तयार केलेले, माती, प्लास्टिक किंवा चेन हॅंगर बास्केट आदी प्रकारचे बास्केट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यात प्लास्टिकपासून तयार केलेले बास्केट हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. कारण हे बास्केट अनेक रंगात आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. बाजारात बास्केटची खरेदी करताना त्याचा रंग किंवा आकार पाहू नका. त्यात पाण्याचा विनियोग कसा होतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण ज्या रंगाचे फूल किंवा रोपट्याची लागवड करणार आहोत, त्यानुसार कुंड्याची खरेदी करावी. गडद रंगाचे फूल असेल तर त्यासाठी पांढरे, हिरवा किंवा हलक्‍या रंगाची बास्केट किंवा कुंडी चांगली राहील.

रोपट्यांची लागवड अशी करा : बास्केटमध्ये रोपटे चांगले वाढावे, टवटवीत राहावे यासाठी शेणखत, चांगली माती असणे, देखभाल करणे गरजेचे आहे. लटकवलेल्या कुंड्यात पसरणारे, लटकणारे किंवा वर सरकणारे रोपटे चांगले दिसतात. मोठ्या आकाराचे लटकणारे झाडाची पाने अतिशय सुंदर दिसतात. लहान कुंडीत वर चढणाऱ्या वेली, पाने चांगले असतात. झाडांची लागवड ही रोपटे किंवा कलमाने केली जाते. यात दक्षता बाळगणे गरजेचे आहे. रोपटे रोगमुक्त असतील, याची खबरदारी घ्यायला हवी.

झाडांना नियमित पाणी : कुंड्यातील रोपट्यांना नियमित पाणी घालणे अत्यावश्‍यक आहे. कारण उंचावर असलेल्या कुंड्यांत पाणी घालणे जरा कंटाळवाणे काम असते. सहजासहजी झाडांना पाणी देता येत नाही. त्यासाठी कुंडी खाली घेऊन किंवा स्टूलवर उभे राहून आपल्याला पाणी घालावे लागते. त्याची सतत निगा राखावी लागते, तरच ते झाड बाराही महिने ताजेतवाने राहू शकते. तसेच रात्रीच्या वेळी कुंडी खाली घ्यावी आणि पाणी घालावे. ती कुंडी रात्रभर खालीच ठेवावी. जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल. ओल्या स्थितीत कुंडी वर नेली तर पाण्याचे थेंब पडत राहतील. म्हणून ती कुंडी सकाळी पूर्वस्थितीत न्यावी. जर कुंडी मोठी आणि वजनदार असेल तर ती सतत खाली आणण्याचा प्रयोग करू नये. आठवड्यातून एकदाच काढून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)