झाडे तोडून खणले खड्डे

कराड-मसूर रस्त्यावर बांधकाम विभागाचे अजब काम
कोपर्डेहवेली – दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शासनातर्फे रस्त्याच्या दुतर्फा व मोकळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असते. यासाठी बराचसा निधी शासन खर्च करीत असते. वृक्षारोपणासाठी खड्डे खणण्याचे काम संबंधित विभागाकडून खासगी ठेकेदारमार्फत करण्यात येते. कराड-मसूर रस्त्यावर बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार ठेकेदाराने पूर्वीचे असलेले झाड तोडून त्याठिकाणी वृक्षारोपणासाठी नवीन खड्डा खणला आहे. बांधकाम विभागाच्या या प्रतापाने सर्वजण अचंबित झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार ठेकेदाराकडून काही ठिकाणी वृक्षारोपणासाठी निवडण्यात येत असलेली जागा खडकाळ आहे. त्याठिकाणी झाडे उगवणार नसल्याने अशा जागेवर खड्डे खणून एकप्रकारे शासकीय निधीचा अपव्यय करण्याचे काम ठेकेदार व अधिकारी करत असल्याचे या खड्ड्यांवरून स्पष्ट होत आहे.

हे सर्व कमी म्हणून की काय कराड-मसूर रस्त्यालगत असलेली झुडपे व मोठ्या झाडांच्या फांद्या तोडून या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डे खणण्यात आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याची भूमिका व्यक्‍त करत असून आम्ही असे काही सांगितलेच नाही असे भासवत नाहीत. असे असतानाही संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. बांधकाम विभाग या प्रकाराबद्दल काय कारवाई करणार? याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये उत्सुकता असून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)