“ट्रेकिंग पलटन’ने सरसगड केला चकाचक!

स्वच्छता मोहीम :गिर्यारोहक, साहसी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

तळेगाव स्टेशन – ट्रेकिंग पलटन ग्रुप पुणे यांच्यातर्फे सरसगड (ता. सुधागड, जि. रायगड) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ग्रुपची ही तीन वर्षांतील 22 वी स्वच्छता मोहीम आहे. अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या बल्ळालेश्‍वर गणपती मंदिर परिसरात खड्या चढाईचा बेलाग कातळ असलेला सरसगड आहे. साहसी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला हा गड आपल्या खड्या चढाईच्या कोरीव पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

रविवारी ट्रेकिंग पलटन ग्रुप, पुणेच्या सदस्यांनी पाली गावातून ट्रेकमार्गावर आणि गड तसेच बालेकिल्ला परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा केला. यामध्ये बाटल्या, ग्लास, फूड पॅंकेट्‌स, पॉलिथिन बॅग असा पर्यावरणास घातक कचरा उचलून गडाच्या पायथ्याशी गोळा केला.

गडावरील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बराच प्लॅस्टिक कचरा गडावरून घसरून/उडून गडाच्या उतारावर आणि पायथ्याच्या परिसरात पडत होता. याचा अर्थ हा घातक कचरा गडावरील नव्हे, तर गडाच्या पायथ्याच्या पर्यावरणाला धोकादायक ठरू शकतो. म्हणून गडाला भेट देणाऱ्यांनी आपला कचरा गडावर न फेकता सोबत घेऊन जावा आणि गडाचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी मदत करावी. या स्वच्छता मोहिमेत ट्रेकींग पलटन ग्रुपचे परशुराम भांगरे, हनुमंत लोंढे, श्रीरंग गोरसे, खंडू दयाळ, हेमंत पाटील, कुमार खुंटे, नितीन बागले, साईनाथ जगदाळे, आकाश शिंदे, सूरज लोंढे, किशोर हांडे, अंकुश धुपाटने, संजय पालकर, डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. संदीप चौधरी आणि डॉ. सुरेश इसावे सदस्यांनी सहभाग घेतला. ग्रृपचे प्रा. डॉ. सुरेश इसावे यांनी या स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले. प्रा. डॉ. अनिता धायगुडे व प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)