माहेरची साडी तशी माहेरची झाडी देवून वृक्षारोपण करा – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – लग्न समारंभात माहेरच्या साडी बरोबरच माहेरची झाडी देवून जिथं तिथं वृक्षारोपण करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत मौजे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमी येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सरपंच प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थी, विद्यार्थींनी, राष्ट्रीय छात्र सैनिक यांच्याबरोबरच वृक्ष संवर्धनाबाबत घोषणा देत भर पावसात वृक्षारोपण केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांना रोप देवून तसेच रोपांना पाणी देवून करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, भर पावसात मोठ्या उत्साहात 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यामधील 1 कोटी 13 लाख 22 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ आज करण्यात आला. गेल्या 70 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही दुष्काळ पडला नाही. राज्यामध्ये 28 हजार गावात दुष्काळ असताना जिल्ह्यातील एकाही गावाचा यात समावेश नव्हता. याचे एकमेव कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांनी त्याकाळात सांगितलेलं झाडांच महत्व होय. राज्यामध्ये 33 टक्के जंगल असायला हवं परंतु ते 20 टक्के इतके प्रमाण आहे. विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ पडण्याचं एकमेव कारण म्हणजे तेथे असणारं जंगलांच कमी प्रमाण. राज्य शासनाने 2 कोटी, 4 कोटी, 13 कोटी आणि 33 कोटी असा 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

झाडं लावणं सोपं आहे, परंतु ते जगवणं मोठं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये लावलेल्या झाडांचं जगण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातील 75 टक्के त्या पुढील वर्षी 85 टक्के त्यानंतरच्या वर्षी 90 टक्के झाडं जगली आहेत, असं सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, वृक्ष लागवडीबरोबरच राज्यामध्ये 65 लाखांची हरित सेना निर्माण झाली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 लाख 72 हजार हरित सैनिकांनी नोंदणी केली आहे. मूल जन्माला आलं एक झाडं मोफत, लग्न समारंभात माहेरची साडी बरोबरच माहेरची झाडी, मृत्यू नंतरही स्मारणार्थ वृक्षारोपण अशा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुलगी जन्माला आली की दहा झाडं लावायची. यामध्ये 5 झाडं सागाची, 2 आंबा फणस, जांभूळ आणि चिंच यांचा समावेश आहे. 18 वर्षानंतर या झाडाचे लाखो रुपये मिळतील, अशा विविध मार्गाने झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. जंगलाचं प्रमाण 20 टक्यावरुन 33 टक्के व्हायला 500 कोटी झाडं लावावी लागणार आहेत. हे आपणा सर्वांना एक आव्हान आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1 कोटी 15 लाख रोप वाढवणं हा ही चमत्कार आहे. जिथं तिथं झाडं लावा, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.

आजारा तालुक्यातील झुलपेवाडी येथील वन व्यवस्थापन समितीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल 51 हजारांचा धनादेश देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य वन संरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी सर्वांचे रोप देवून स्वागत केले. उपवन संरक्षक हणमंत धुमाळ यांनी प्रस्ताविक केले. वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)