पुणे – उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा “विक्रम’

8 लाख 3 हजार 684 झाडे लावण्यात आली : जगविण्यासाठी “बिहार पॅॅटर्न’ राबविणार

पुणे – राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेला यावर्षी साडेसात लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, उद्दिष्टापेक्षाही अधिक रोपांची लागवड केल्याचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री आणि कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले. यावर्षी 8 लाख 3 हजार 684 झाडे लावण्यात आली असून, ती जगविण्यासाठी “बिहार पॅॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. सर्वाधिक झाडे ही अवर्षणग्रस्त इंदापूर तालुक्‍यात लावण्यात आली आहे.

-Ads-

पर्यावरण संवर्धनासाठी राज्यशासनाने 13 कोटी लागवडीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या अंतर्गत राज्यात वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. जिल्हा परिषदेतर्फे स्वतंत्र वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत विभागातर्फे 4 लाख 70 हजार तर ग्रामविकास विभागातर्फे 2 लाख 5 हजार 155 असे 6 लाख 75 हजार 155 वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवले होते. कृषी, शिक्षण, बालकल्याण, आरोग्य आणि पशूसंवर्धन विभागाने 1 लाख 10 हजार झाडे लावण्याचे ठरवले होते. यासाठी जवळपास 8 लाख खड्डे घेण्यात आले. सामाजिक वनिकरण विभागाद्वारे वनविभागामार्फत लागवडीसाठी कांचण, आपटा, वड, पिंपळ, आवळा, बांबू ही रोपे पुरविण्यात आली. वृक्षलागवडीसाठी सर्व स्तरावरून व्यापक मोहीम राबविण्यात आल्या.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. यात शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग घेतला. यामुळे 100 टक्‍यांपेक्षाही पुढे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. दरम्यान, लावलेली झाडे जगवण्यासाठी नरेगा अंतर्गत चार कुटुंबांना 100 दिवसांसाठी 200 झाडांच्या सर्वंधनाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामध्ये एका कुटुंबाकडे 30 दिवस जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना दिवसाला 203 रुपये असे महिन्याला 6 हजार 75 रुपये मिळणार आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था तसेच विद्यार्थ्यांनीही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतल्याने यावर्षी वृक्षसंवर्धनाचा टक्काही वाढणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)