उद्दिष्टपूर्ती झाली, आता वृक्ष जोपासनेचे आव्हान

संग्रहित छायाचित्र....

पुणे – हरित महाराष्ट्रासाठी प्रयत्नशील असणाऱ्या राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण झाले. दि.31 जुलै रोजी मोहिमेचा समारोपही झाला. वेळेआधीच उद्दिष्ट पूर्तीबद्दल शासकीय यंत्रणांचे कौतुकच, पण त्याचबरोबर ज्या उत्साहाने विशेषत: वन विभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले, त्याच जोमाने लावलेल्या रोपांची जोपासना करणे, हे एक मोठे आव्हान या विभागांसमोर आहे.

पर्यावरणाचा असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यामुळे दैनंदिन जीवनावर होणाऱ्या गंभीर परिणामांपासून मुक्ती मिळविण्यासाठी शाश्‍वत आणि पर्यावरणपूरक विकासाची ठोस पावले उचलणे आवश्‍यक होते. त्यासाठी सध्या उपलब्ध भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्‍के भाग वृक्षाच्छादित असणे आवश्‍यक आहे, ही बाब गांभीर्याने घेत राज्य सरकारने या वनमहोत्सवाची सुरू केली. तसेच सर्व शासकीय, अशासकीय, खाजगी संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी इतक्‍या क्षमतेने आणि पूर्णपणे वाहून घेत काम करणारे हे राज्याचा महसूल व वन विभाग हा एकमेव विभाग आहे. खुद्द वनमंत्री या उपक्रमाबाबत अतिशय “सीरियस’ असून स्वत: सर्व कामांचा आढावा घेतात. त्यामुळेच या कामाला गती मिळत असल्याचे वन विभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी सांगतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उपक्रमाला समाजाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण झाले असून, पुढील महिनाभरात लागवडीचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्‍यता या विभागांतर्फे वर्तविण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम राबविताना, लागवडीसोबतच रोपांचे संवर्धन करण्याचेही आव्हान या विभागांसमोर आहे. विशेषत: वनेत्तर नागरी क्षेत्रात रोपांचे संवर्धन करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अशा ठिकाणी रोपांची लागवड केल्यानंतर रात्रीतच रोपे उखडून फेकली जातात. रोपांभोवती असणाऱ्या संरक्षण जाळ्यांची, रस्त्याच्या कडेला लावलेल्या रोपांची चोरी असे प्रकार केले जातात. याव्यतिरिक्त रोपांची योग्य निगा न राखल्यामुळे ती कुजण्याचे प्रकारही घडतात. या सर्व समस्यांवर उपाययोजना करून, जास्तीत-जास्त रोपांचे, वृक्षांचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण काम आगामी काळात शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांना एकत्रितपणे करायचे आहे. तेव्हाच हा वनमहोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी होऊन पर्यावरण रक्षणासाठी आपण एक पाऊल पुढे जाऊ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)