वृक्षलागवड मोहिमेत पुणे “उणे’च

उद्दिष्टपूर्ती झालीच नाही : सोलापूरही पिछाडीवरच

मराठवाडा, विदर्भात मात्र लागवडीचे “टार्गेट’ पूर्ण

-Ads-

पुणे – राज्य सरकारने आयोजित केलेल्या वनमहोत्सवात जुलैमध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण झाले आहे. यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला असताना, शासनाने वेळेआधीच हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात 100 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागवड झाली आहे. मात्र, पुण्यात या महोत्सवांर्गत फक्‍त 64.06 टक्के इतकीच वृक्ष लागवड झाली आहे.

वनमहोत्सवांतर्गत यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये सर्व शासकीय विभाग, केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभाग, संरक्षण विभाग, वैयक्तिक पातळीवर तसेच खाजगी संस्था देखील यामध्ये सहभागी झाल्या. यात प्रामुख्याने वनांव्यतिरिक्‍तच्या क्षेत्रांत वृक्ष लागवड करणे आवश्‍यक होते. यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक उद्दिष्ट देण्यात आले. यात सर्वच स्तरांमधून चांगला पाठिंबा मिळाला. यामुळेच वेळेआधीच लागवडीची उद्दिष्टपूर्ती झाली, अशी माहिती सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुपम चौधरी यांनी दिली. तसेच वन विभागाच्या संकेतस्थळावरदेखील यासंदर्भातील माहिती सातत्याने प्रकाशित केली जात होती. विशेषत: तरुणाईचा या कार्यात चांगला सहभाग होता. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यासारखे उपक्रमकही यावेळी झाले. अनेकांनी आपण केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो, व्हिडिओ प्रशासनाने सोशल मीडियावर “शेअर’ केले आहेत.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला मराठवाडा आणि विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जिल्ह्यांत उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लागवड झाली. यामध्ये नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र गेली दोन वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत केवळ 62.06 टक्के म्हणजेच 45 लाख 57 हजार 727 इतके वृक्षारोपण झाले आहे. राज्यात सर्वात कमी लागवड सोलापूर जिल्ह्यात झाली आहे.

आकडेवारीचा घोळ

वनविभागाच्या माहितीपुस्तिकेत पुणे जिल्ह्यासाठी ५५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. वन विभाग आणि सामाजिक वानिकन विभागाचे अधिकारीदेखील ५५ लाखांचे उद्दिष्ट असल्याचे सांगतात. मात्र, राज्यसरकाच्या संकेतस्थळावर  हे उद्दिष्ट ७१ लाख १४ हजार २३५ इतके आहे. याबाबत वनविभागाचे सहायक उप-वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, ‘उपक्रमाच्या सुरुवातीला ७० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र इतक्या जागा उपलब्ध नसल्याने सर्व विभागांच्या विनंतीनुसार, हे उद्दिष्ट कमी करून ५५ लाख करण्यात आले. परंतु, सोशल मीडियावर हि माहिती ‘अपडेट’ केली नसावी.’

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)