किवळे-सांगवी फाटा बीआरटीएसचा प्रवास अडथळ्यांचा

कित्येक ठिकाणी मार्ग बंद, सेवा रस्त्याने धावते बस

पिंपरी – किवळे ते सांगवी फाटा बीआरटीएस मार्गावर थेरगाव-संतोषनगर ते जगताप डेअरी-साई चौकापर्यंतचा बीआरटीएस बस मार्ग सध्या बंद आहे. साई चौकात सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम आणि रहाटणी-शिवराजनगर येथे सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या (सब-वे) कामासाठी मुख्यत्वे संबंधित पट्ट्यातील मार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे बीआरटीएसचा प्रवास हा अडथळ्यांचा ठरत आहे.

किवळे ते सांगवी फाटा या अंतरात याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, बीआरटीएस बससेवेच्या मार्गातील प्रमुख अडथळ्यांची माहिती जाणून घेतली. किवळे बस टर्मिनल येथून निघालेल्या “पीएमपीएमएल’ बसचा प्रवास थेरगाव-संतोषनगरपर्यंत विना अडथळा झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. मात्र, संतोषनगरपासून पुढे कावेरीनगर आणि पार्क स्ट्रीटसमोर उच्च विद्युत दाब वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम बाकी आहे. तसेच, रहाटणी-शिवराजनगर येथे “सब-वे’चे काम सुरू आहे. त्यामुळे बीआरटीएस बस मार्ग बंद केलेला आहे. पर्यायाने, संतोषनगरपासून पुढील प्रवास हा सेवा रस्त्याने सुरू होतो.

काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी दरम्यान बस सेवा रस्त्याने जात होती. त्यातही जगताप डेअरी येथे आल्यानंतर पुण्याकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी चौकातून पुढे जाण्याचा रस्ता बॅरिकेट्‌स टाकून बंद केलेला आहे. त्यामुळे बसला शिवार चौकातून वळसा घालून पुढे पुण्याच्या दिशेने जावे लागत होते. त्यानंतर, मात्र सांगवी फाट्यापर्यंत विना अडथळा प्रवास झाला. सांगवी फाट्यावरून किवळेकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसला देखील अशाच विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला. जगताप डेअरी येथील चौकात टाकलेल्या बॅरिकेटसमुळे वाकड-कस्पटे वस्ती येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानापासून बसला वळसा घालून पुन्हा चौकात यावे लागले. तेथून पुढे सेवा रस्त्याने संतोषनगरपर्यंतचा प्रवास झाला. संतोषनगरपासून किवळेपर्यंतचा प्रवास मात्र विना अडथळा झाला.

जगताप डेअरी-साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलापैकी एका उड्डाणपुलाचे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे. मात्र, हे काम करताना दर्जाच्या बाबतीत तडजोड करू नये. येथील उड्डाणपुलाचे व “सब-वे’चे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित टप्प्यातील “बीआरटीएस’ रस्ता खुला होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल.

– भाग्यश्री कुलकर्णी, स्थानिक नागरिक, पिंपळे सौदागर

जगताप डेअरी – साई चौकातील उड्डाणपुलाचे काम प्राधिकरणातर्फे केले जात आहे. तर, महापालिकेकडून ग्रेडसेपरेटरचे काम करण्यात येत आहे. संबंधित चौकातील कामे पूर्ण झाल्यानंतर तेथील बीआरटीएस लेन खुली करता येईल. कावेरीनगर आणि पार्क स्ट्रीट येथील उच्च विद्युत दाब वाहिनीचे स्थलांतर बाकी आहे. शिवराजनगर येथील “सब-वे’चे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. संबंधित कामे झाल्यानंतर संतोषनगर ते शिवराजनगर या अंतरातील “बीआरटीएस’ लेन खुली होईल.

– ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)