मुंबई – राज्यातील पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 52 पोलीस अधिक्षक आणि पोलीस उप आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी गृह विभागाने बदल्यांचे हे आदेश जारी केले.
यामध्ये नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोषी यांची बदली मरोळ येथील प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आली आहे. तर मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सोमनाथ घार्गे यांची बदली बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदावर केली आहे.
गुप्तवार्ता कक्ष दहशतवादी विरोध पथक मुंबईचे पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांची बदली पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई पदी केली आहे. फोर्स वन, अर्बन काऊन्टर प्रशिक्षण संस्था मुंबईचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांची बदली पोलीस उप आयुक्त ठाणे शहर पदी करण्यात आली आहे. राज्य पोलीस नियंत्रण कक्ष आणि सहायक विशेष पोलीस महानिरिक्षक मुंबईचे पोलीस अधिक्षक विजय खरात यांची बदली नाशिक येथे पोलीस उप आयुक्त पदी केली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती ही तात्पुरती स्वरुपाची आहे.