तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत

तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक सदिच्छादूत (ॲम्बेसेडर)म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे.

2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती.  2014मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या 2,086 इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या चार मतदारसंघात अनुक्रमे 113, 184, 324 आणि 123 तृतीयपंथाची नोंद झाली आहे. मुंबई उत्तर या मतदारसंघातून सर्वाधिक 324तृतीयपंथीची नोंद झाली आहे.

गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल.येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथीसुद्धा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)