‘मुळशी पॅटर्न’चा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉंच

औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या उभ्या राहिल्या त्यांच्यापर्यंत या विकासाचा लाभ पोहोचला नाही. विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आज लॉंच झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे.

‘मुळशी पॅटर्न’ ची निर्मिती अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये विकासाच्या नावाखाली जमिनी गेल्यावर शेतकऱ्याच्या वाट्याला येणारा अस्वस्थपणा, विस्थापित होऊन गाठलेले शहर आणि तिथे नजरेस पडणारे जगण्यातील भकासपणा दिसतो. भूमिहीन शेतकऱ्याची पुढची अस्वस्थ पिढी गुन्हेगारीकडे कशी वळली? यावर थेट भाष्य करण्यात आल्याचे दिसते. धारदार संवाद, गाणी आणि टीजर मधून निर्माण झालेली ‘मुळशी पॅटर्न’ची उत्सुकता या अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे अधिक ताणली गेली आहे.

चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण विठ्ठल तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा ‘मुळशी पॅटर्न’मधून पदार्पण करत आहे.

‘मुळशी पॅटर्न’ची गाणी गीतकार प्रणित कुलकर्णी यांची असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे, तर छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. शेतीशी निगडीत समस्येवर सडेतोड भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ येत्या २३ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)