“एसटी’कडून प्रवाशांची हेळसांड

खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, तुटलेली आसने अन्‌ गळक्‍या बसेसमुळे वाताहात
लालपरीचा प्रवास ठरतोय धोक्‍याचा एसटी महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रकाश राजेघाटगे

लाल परीकडे दुर्लक्ष

लालपरीचे चालक वाहक यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. कमी पगारात प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याची जबाबदारी हे चालक – वाहक करत आहेत. परंतु प्रशासन लालपरीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असेल तर घातपात झाल्यास दोष कुणाचा? महामंडळाच्या अनेक बसेस शेवटचा घटका मोजत आहेत. या लालपरीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होण्याऐवजी खडतर होत आहे.

बुध – राज्यातील कोट्यवधी लोकांची लोकवाहिनी ठरलेली लालपरी म्हणजेच एसटीची साताऱ्यातील सध्याच्या अवस्था मात्र बिकट झाली आहे. एसटी बसेसकडे झालेल्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे. फुटलेल्या खिडक्‍या, तुटलेली आसने आणि गळके छत यामुळे एसटी प्रवाशांची सध्या चांगलीच वाताहात सुरू आहे. मात्र, प्रवाशी हेच आमचे दैवत अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटी प्रशासनाला आपल्या दैवताची कितपत फिकीर आहे हे एसटी बसेसची अवस्था पाहिल्यानंतरच स्पष्ट होत आहे.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित व सुखाचा समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रथम पसंती एसटी बसला असते. परंतु भंगार झालेल्या बसेसमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे चित्र ग्रामीण भागासह जिल्हाभरात दिसत आहे. बसची आसने फाटलेली तर काही आसनांच्या टेका तुटलेला, खिडक्‍यांच्या काचा फुटलेल्या तसेच आपत्कालीन खिडकीच्या दरवाजा दोरीने बांधलेला अशा धोकादायक परिस्थितीत प्रवाशांनी प्रवास कसा करावा? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस आल्यानंतर फुटलेल्या खिडकीतून वारा, पाऊस यापासून महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आदी प्रवाशांची सुरक्षा कशी होणार? अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सुरक्षित बसचा प्रवास हा धोकादायक झाला आहे. या बाबीकडे महामंडळ प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देऊन प्रवाशांची हेळसांड थांबवून सुरक्षित प्रवास व्हावा याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एसटी बसेस खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांसाठी एसटी बसेस डोकेदुखी ठरत आहे. परिणामी प्रवासी वर्ग खासगी बसकडे वळत आहे.

एसटीच्या विविध योजना व वाढती महागाई याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळावर होत आहे. याशिवाय खासगी बससेवा आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसून येते. त्या अनुषंगाने प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना एसटी महामंडळाच्या हिरकणी कक्ष, विद्यार्थ्यांना पास सेवा, ज्येष्ठ नागरिक पास योजना, मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, मोफत विमा योजना आदी प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. प्रवाशासाठी लाभदायक असलेल्या योजना एसटी महामंडळाने राबविल्या तरी प्रवासादरम्यान आवश्‍यक त्या सुविधा मिळत नाहीत. परिणामी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. विविध 40 टक्के कर्मचाऱ्यांचा अभाव, विविध योजनांचा भार, एसटी बसची झालेली दुरवस्था आणि महामंडळाला होत असलेला तोटा आदी कारणामुळे एसटी महामंडळाचा प्रवास खडतर झाला आहे. हा मार्ग सुकर करण्यासाठी महामंडळाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)