वाहतूक पोलिसाचे वाहनधारकाशी असभ्य वर्तन

सातारा शहरातील प्रकार : कारवाई करण्याची मागणी

सातारा – आधीच शहरात सुरु असणाऱ्या ग्रेडसेप्रेटरच्या कामामुळे सातारकर नागरिक त्रस्त असताना आता वाहतूक पोलिसांकडूनही वाहनधारकांचा छळ सुरु झाला आहे. वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरील वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलून नेत असून त्याठिकाणी संबंधित वाहनांचे नंबरही टाकले जात नाहीत, याशिवाय स्पीकरवर कोणतीही सूचना दिली जात नाही, त्यामुळे आपले वाहन चोरीला गेले की काय? असा समज संबंधित वाहनधारकांचा होत आहे.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलिसांकडे विचारणा केली असता “तुम्ही आम्हाला कायदा शिकवणार का?’, “इतकी वर्षे काम करुन डोक्‍याचे केस पांढरे झाले आमचे’, अशा प्रकारची उर्मट उत्तरे दिली जात असून वाहनधारकांशी असभ्य वर्तन केले जात आहे. याप्रकरणी सदरबझार येथील प्रशांत नलवडे या युवकाने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे लेखी तक्रार दिली असून तसे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

सदरबझार येथील प्रशांत निवास नलवडे या युवकाने सोमवार, दि. 11 रोजी पोवईनाका परिसरात एमएच 11 एफ 3163 ही दुचाकी लावली होती. यादरम्यान वाहतूक शाखेचे कर्मचारी अरुण मोहन पाटील (बक्कल नं. 1968) हे त्याठिकाणी सहकाऱ्यांसमवेत क्रेन घेऊन आले. त्यांनी प्रशांतची दुचाकी उचलून क्रेनमध्ये टाकून वाहतूक विभागात आणली. दुचाकी उचलून नेल्यानंतर अरुण पाटील यांनी त्याठिकाणी दुचाकीचा नंबर लिहिणे अथवा स्पीकरवर अनाऊंस करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे काहीही केले नाही. त्यामुळे थोड्या वेळाने त्याठिकाणी आलेल्या प्रशांत नलवडे यास आपली दुचाकी चोरीला गेल्याचा समज झाला व त्याने सर्वत्र शोधाशोध सुरु केली. परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही.

त्यानंतर घटनास्थळावरील काही नागरिकांनी तुझी दुचाकी कदाचित पोलिसांनी उचलून नेली असेल असे सांगितले. त्यानंतर त्याने थेट वाहतूक शाखेचा विभाग गाठला त्यावेळी त्याला त्याची दुचाकी तिथे दिसली. त्यानंतर त्याने अरुण पाटील यांची भेट घेऊन दुचाकी उचलल्यानंतर त्याठिकाणी नंबर लिहिणे किंवा स्पीकरवर अलाऊंन्स करणे गरजेचे असताना तसे काहीच केले नाही अशी विचारणा केली असता अरुण पाटील यांनी प्रशांतशी हुज्जत घालत “तू आम्हाला कायदा शिकवणार का?’, “इतकी वर्षे काम करुन डोक्‍याचे केस पांढरे झाले आमचे’, अशाप्रकारे उर्मट भाषेत एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे धारेवर धरले. या घटनेनंतर प्रशांत नलवडे याने जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या तक्रारी प्रत जिल्हाधिकारी, सातारा, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच पालकमंत्र्यांनाही दिली आहे.

आम्ही राजधानी साताऱ्यात सामाजिक स्तरावर कार्य करत आहोत. प्रत्येकाशी सलोख्याने राहणारा दुवा म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाहिले जाते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांशी असभ्य वर्तन होत आहे. वाहतूक पोलिसांच्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीसदल बदनाम होत आहे. त्यामुळे अरुण पाटील यांसारख्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

प्रशांत नलवडे, सातारा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)