उपमार्गावरील पार्किंगमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा

वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; रुग्णवाहिकांनाही मिळेना रस्ता

कराड –
मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा अक्षरश: खेळखंडोबा झाला आहे. रोजच होणाऱ्या या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडण्याच्या घटना घडत असतानाही वाहतूक पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांसह पादचाऱ्यांना होवू लागला आहे. कृष्णा रुग्णालयात रोज येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता याठिकाणी पार्किंगची सोय होती. यामुळे सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्‍न निर्माण होत नव्हता. मात्र याठिकाणी रुग्णालय व्यवस्थापनाचे वतीने भव्य पार्किंगसाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयात येणारी वहाने रुग्णालयाचे बाहेरच म्हणजे सेवारस्त्यावर लावावी लागत आहेत. रुग्णालयाचे समोरच उड्डाणपूल आहे.

या पुलाखालीच दुचाकी, चारचाकी वहाने उभे केली जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. यामुळे कराडकडून व मलकापूरकडून कृष्णा रुग्णालयात जाणाऱ्या तसेच रुग्णालयातून इतरत्र जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या कोंडीत अडकून पडण्याची वेळ येत आहे. या परिसरात अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रकार हा नित्याचाच बनला आहे.

अशावेळी दोन मिनिटांच्या प्रवासाला अर्धा ते एक तास घालविण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. या गंभीर समस्येची वाहतूक पोलिसांनी दखल घेणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या वाहतुकीच्या कोंडीमुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किल बनले आहे. यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना राबवून याठिकाणी होणारी बेसुमार वाहतुकीची कोंडी तत्काळ फोडून याठिकाणची वाहतूक सुरळीत करावी. अशीही मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

कृष्णा रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी व्यवस्थापनाने आगाशिवनगर परिसरात पार्किंगची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र याठिकाणी वाहनधारक आपली वाहने पार्किंग करत नाहीत. त्यामुळे पुलाखाली वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. नागरिकांनी रुग्णालयाने केलेल्या पर्यायी व्यवस्थेचा वापर केल्यास याठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही.

शरद शेलार ,नागरिक, आगाशिवनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)