राहाता तालुक्यात सुमारे दोन हजार टन द्राक्ष खरेदी
राहाता: द्राक्ष खरेदीसाठी बाहेरून व्यापारी न आल्याने चिंतेत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे दोन हजार टन द्राक्ष योग्य दराने खरेदी करून स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याबद्दल राहाता तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना धन्यवाद देत त्यांचा सत्कार केला.
दुष्काळाच्या झळा सोसत पाणीटंचाईचा सामना करून सांभाळलेल्या राहाता तालुक्यातील द्राक्ष बागांना यावर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षघड लगडलेली होती. यंदा बाहेरचे व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी राहात्यात न आल्याने या द्राक्षांची विक्री कुठे व कशी करायची, द्राक्षाला भाव मिळेल की नाही, हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून तर घेणार नाही ना? अशा एक ना अनेक समस्यांनी द्राक्ष बागायतदार शेतकरी गुरफटले गेले होते. भीतीच्या सावटाखाली व मोठ्या चिंतेत शेतकरी असताना राहाता शहरातील फळ व्यावसायिक (बागवान) त्यांच्या मदतीला धावून आले. मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना चांगला भाव देत राहाता, साकुरी, पिंपळस, वाकडीसह परिसरातील सुमारे शेकडो टन द्राक्षांची बागेत जागेवर खरेदी करून शेतकऱ्यांची चिंता दूर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा व सुखद धक्का बसला. आर्थिक तोटा टळला.
तालुक्यात दरवर्षी द्राक्ष खरेदी करण्यासाठी राज्यातील तसेच परजिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने येत असे. यंदाच्या वर्षी मात्र सर्वत्रच द्राक्षाचे पीक चांगले असल्याने व्यापाऱ्यांनी राहाता तालुक्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली द्राक्ष विक्री कशी करायची, ही मोठी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. सुमारे दोन टन द्राक्षाचे उत्पादन राहाता तालुक्यात झाल्याने कवडीमोल भावात माल विकावा लागतो की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. राहाता शहरातील बागवान अर्थात फळ व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. पूर्वी फक्त पेरू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यावेळी द्राक्ष बागांमध्ये जाऊन थेट द्राक्षाची खरेदी केली आहे.व्यापाऱ्यांनी संकटकाळी द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांना साथ दिल्याने साकुरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय उपाध्ये व संजय निरगुडे यांच्या कल्पनेतून स्थानिक खरेदीदार व्यापाऱ्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप रोहोम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीनराव कापसे पाटील, आर. सी. दंडवते, संदीप सांड, विलास रोहोम, शरद बावके, बाळासाहेब कुदळे, सतीश कुदळे, रंगनाथ दंडवते, आर. सी. दंडवते, संपतराव दंडवते, डॉ. बावके गुलाब खापटे, मुन्ना दंडवते, बंटी दंडवते, विनायक दंडवते, राजू गोसावी, स्वप्नील रोहम, अजित रोहम, विलास रोहम, अप्पासाहेब कुदळे, शेतकऱ्यांनी द्राक्षे व्यापारी शफीक शेख, असिफ शेख, अन्सार शेख, गोरख निर्मळ, अमित रोहम, बाळासाहेब निरगुडे, सुभाष अप्पा सदाफळ आदींचा सत्कार केला आहे.