अबाऊट टर्न: खेळणं…

हिमांशू

आला… व्हॉट्‌स ऍपला अखेर पर्याय आला! हे ऍप हुबेहूब व्हॉट्‌स ऍपसारखं नाही; परंतु खेळणं म्हणून छान आहे. त्या अर्थानं “पर्याय’ म्हटलं, इतकंच! तंत्रज्ञान आम्हाला खेळणं म्हणूनच हवं आहे. आम्हाला पेट्रोल, डिझेल, गॅससाठी कितीही पैसे मोजावे लागले तरी चालतील. शिक्षण, आरोग्यासाठी कितीही खर्च झाला तरी चालेल; परंतु डाटा मात्र स्वस्तच असायला हवा. कारण, तंत्रज्ञानाशी खेळून आम्ही आमची बेरोजगारी, भूकेकंगाली सगळं सगळं विसरतो. तंत्रज्ञानामुळं हळूहळू आम्ही सगळ्याच गोष्टींचा “खेळ’ बनवलाय. अगदी राजकारणाचासुद्धा! पात्रतेचा कॉम्प्लेक्‍स न बाळगता बेधडक बोलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला या तंत्रज्ञानानंच तर दिलं.

फेसबुक, व्हॉट्‌स ऍपवर आम्ही भरपूर खेळतो; पण आता त्यातही तोचतोपणा यायला लागलाय. आमच्यासारखेच इतरही बोलतात ना! त्यामुळं प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर मिळतंच. या प्रश्‍नोत्तरांच्या खेळात मूळ विषय बाजूला राहतो आणि मग कंटाळा येतो खेळण्याचा. राजकारणाचा खेळ चांगलाच रंगलाय सोशल मीडियावर. पण, कुणीच आपली मतं बदलत नाही हो! कितीही कळवळून सांगा, तर्कसंगत कारणं द्या, प्रसंगी शिवीगाळ करा… पण मतं बदलतील तर शपथ! निवडणूक हा तर मतांचा खेळ. त्यामुळं आधीच घट्ट असलेली मतं अधिकाधिक घट्ट होत जातात. कधीकधी समोरच्याला काय सांगावं हेच कळेनासं होतं. त्यामुळं वाटतं, नकोच हा खेळ खेळायला!

पण, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही भलतेच भाग्यवान. एक खेळणं बाजूला ठेवेपर्यंत दुसरं हजर होतं. आता खुद्द निवडणूक आयोगानंच “सी-व्हिजिल’ नावाचं ऍप आमच्या हाती दिलंय. कुठं काही घडतंय का, याचा कानोसा घ्यायचा… खुट्‌ वाजलं तरी आवाजाचा वेध घ्यायचा. दिसेल त्याचा फोटो काढायचा. फक्‍त जीपीएस ऑन असावा लागतो. मग, तो फोटो निवडणूक आयोगाला पाठवून द्यायचा. निनावीही पाठवता येतो म्हणे! सरकारी अधिकारी तरी तसंच सांगतायेत. त्यांच्याकडे येणाऱ्या बहुतेक तक्रारी निनावीच आहेत. पण दखल घ्यायलाच लागते. ऑर्डर आहे तशी. मग आपण जिथून फोटो पाठवला, तिथं अर्ध्या तासात सरकारी माणसं येतात. तोपर्यंत तिथलं चित्र बदललेलं असतं. सरकारी माणसं हात हलवत परत जातात. फिरा म्हणावं उन्हातान्हातून! नेहमी पंख्याखाली बसायची सवय लागलीय ना! आपण त्यांचे हेलपाटे कुठंतरी लपून पाहत राहायचं.

कसला भन्नाट खेळ ना? शिवाय, रिअल गेम! सतत व्हर्च्युअल जगात राहतो, असा आक्षेप कुणी घ्यायला नको आपल्यावर! पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. शिवाय जबाबदार झाल्यासारखंही वाटतंय. कुठं पैसे वाटताहेत म्हणून तक्रार करायची, तर कुठं दारूची पार्टी चाललीय असं कळवायचं. परवा एकानं सुचवलं, दोघांच्याही सुपाऱ्या घेऊ… एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्याच्या!

आमच्यासारखंच अनेकांचं बालपण परिस्थितीनं हिरावून घेतलं. खेळायचं होतं तेव्हा खेळू शकलो नाही. आता भरपूर खेळायचं ठरवलंय. खेळण्यांचं दुकान ठासून भरलंय. एका खेळण्याचा कंटाळा आला की दुसरं समोर येतंय. फारसे पैसेही खर्च होत नाहीत. खेळण्यासाठी भिडूही लागत नाही. एकदा सगळ्याच गोष्टींना खेळ मानण्याची सवय जडली, की लहानपण आपोआप परतून येतं. जोपर्यंत या देशात डाटा महाग होत नाही, तोपर्यंत चिंता नाही. तहान-भूक विसरून फक्त खेळत राहायचं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)