पूर्वेकडे पाण्याची काटकसर, पश्‍चिमेकडे वारेमाप वापर

जलसाक्षरता मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज
किरण देशमुख


खटाव – पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल अशी देणगी आहे. प्राणीमात्रांच्या मूलभूत गरजापैकी पाणी ही महत्त्वाची गरज आहे. अन्नावाचून सजीव बराचकाळ जीवंत राहू शकतो; पण पाण्यावाचून तो फार काळ जीवंत राहूच शकत नाही. या महत्त्वाच्या संजीवकाविषयी दुर्दैवाने अजूनही लोकांमध्ये जनजागृती झाली नसल्याचे आढळून येत आहे. एकीकडे दुष्काळी माण-खटावसारखे तालुके पाण्याची काटकसर करत असताना मुबलक पाणी असणाऱ्या भागात पाण्याचा वारेमाप वापर होत असतो.

माणसाच्या शरीरातील बऱ्याच अंशी भाग रक्त, मूत्र, चरबी, हाडे यांच्यामध्ये असणाऱ्या पाण्याने व्यापलेला आढळतो. मानवी शरीराला अनावश्‍यक व विषारी घटक मूत्र, घाम याद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जातात. शरीरामध्ये पाणी साठवून ठेवण्याची सोय नसल्यामूळे शरीरास दररोज ठराविक प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता भासते. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी सेवनाची नितांत गरज असते.

मानवाचे आरोग्य व्यवस्थित व निरोगी राहण्यासाठी शरीरातील पाणी पातळी योग्य असावी लागते. अन्यथा मुत्रविकार, मानसिक विकारांसारखे आजार वाढीस लागतात. नेहमी योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तहान लागल्यास आजिबात दुर्लक्ष करू नये. तहान शमवण्यासाठी कोल्ड्रींक्‍सचा वापर न करता पाण्याचा वापर करावा. फळांचे ज्यूस पिण्यापेक्षा फळ खानेच श्रेयस्कर आहे.

पाणी एक असा द्रव पदार्थ आहे. जो भूतलावर जवळ-जवळ 70 टक्के आढळतो. भूतलावर एवढे मुबलक पाणी असूनसुद्धा फक्त 3 टक्केच पाणीच पिण्यास व वापरास योग्य समजले जाते. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर आवश्‍यक आहे. हे पाणी आपणास विहीरी, तलाव, कूपनलीका, नदी, ओढे, झरे, पाऊस आदी जलस्त्रोतांपासून उपलब्ध होत असते. सध्या पाण्याचा गैरवापर वाढला आहे.

पाण्याशिवाय जीवसृष्टी जीवंतच राहू शकत नाही. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, जीरवणे, धरणे बांधणे, संरक्षण करणे, संवर्धन करणे, काटकसरीने पाण्याचा वापर करणे, प्रदूषण थांबवणे, पाण्याचा अपव्य टाळणे व जनजागृतीतून जलसाक्षरता वाढवणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात पाणी हा घटक समाविष्ट करावा. त्यामुळे पाण्याबाबत लोकजागृतीस व जलजागृतीस मदतच होईल. आज सरकार प्रसार माध्यमांच्या मार्फत जलजागृती करत आहे. परंतु लोक गांभीर्याने त्याची दखल घेत नसल्याचे आढळून येत आहे. आपल्या वर्तमानाबरोबरच भविष्यातील पिढ्या वाचविण्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य त्या उपाययोजना करून आज आवश्‍यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)