टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा: स्टेफानोसचा झ्वेरेव्हवर सनसनाटी विजय 

नदाल-खाचानोव्ह उपान्त्य लढत रंगणार 
 टोरांटो: ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस सित्सिपासने द्वितीय मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्हवर तीन सेटच्या कडव्या झुंजीनंतर मात करताना टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. स्टेफानोसने गतविजेत्या झ्वेरेव्हचे आव्हान 3-6, 7-6, 6-4 असे मोडून काढताना सलग दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजयाची नोंद केली.
झ्वेरेव्हने पहिला सेट 6-3 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. इतकेच नव्हे तर दुसऱ्या सेटमध्ये 5-2 अशी निर्णायक आघाडी घेत झ्वेरेव्हने विजयाकडे आगेकूच केली होती. परंतु स्टेफानोसने तेथून सामन्याचे पारडे फिरविले. त्याने आठव्या आपली सर्व्हिस राखली आणि नवव्या गेममध्ये झ्वेरेव्हची सर्व्हिस भेदल्यावर दहाव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस राखताना हा सेट टायब्रेकरमध्ये नेला.
टायब्रेकरमध्ये दोन मॅचपॉइंट वाचविल्यानंतर स्टेफानोसने पाचव्या सेटपॉइंटला बाजी मारली व सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमधील तिसऱ्या गेममध्ये झ्वेरेव्हची सर्व्हिस भेदत स्टेफानोसने 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखताना त्याने 5-4 आणि 6-4 असा हा सेट जिंकून उपान्त्य फेरीतील स्थान निश्‍चित केले. प्रयत्नांना यश मिळतेच हे मला या विजयातून समजून चुकले, असे स्टेफानोसने या विजयानंतर सांगितले.
स्टेफानोसने याआधीच्या फेरीत विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा धक्‍कादायक पराभव करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. झ्वेरेव्हवरील विजयामुळे स्टेफानोसने मास्टर्स-1000 दर्जाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत स्थान मिळविले आहे. तसेच त्याने सलग तिसऱ्या सामन्यात विश्‍वक्रमवारीतील टॉप-10 खेळाडूला पराभूत करण्याची स्वप्नवत कामगिरी बजावली आहे. माझ्या कामगिरीवर माझाच विश्‍वास बसत नाही, असे स्टेफानोसने म्हटले आहे.
त्याने आधीच्या फेरीत डॉमिनिक थिएमला पराभूत करीत आपला पहिला बळी मिळविला होता. गेल्या रविवारीच आपला 20वा वाढदिवस साजरा केलेल्या स्टेफानोससमोर आता दक्षिण आफ्रिकेच्या चतुर्थ मानांकित केविन अँडरसनचे खडतर आव्हान आहे. विम्बल्डन स्पर्धेतील उपविजेत्या अँडरसनने दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात बल्गेरियाच्या पाचव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हचा प्रतिकार 6-2, 6-2 असा एकतर्फी लढतीत मोडून काढला.
दरम्यान आधीच्या फेरीत स्टॅनिस्लास वॉवरिन्कावर मात करणाऱ्या नदालने सहाव्या मानांकित मेरिन सिलिचचे आव्हान 2-6, 6-4, 6-4 असे मोडून काढत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. हार्डकोर्ट मोसमाच्या प्रारंभी होणाऱ्या स्पर्धेत उपान्त्य पेरी गाठल्याबद्दल नदालने समाधान व्यक्‍त केले. नदालने याआधी हार्डकोर्टवरील अखेरचे विजेतेपद 2013 मध्ये मिळविले होते. अमेरिकन ओपन स्पर्धा दोन आठवड्यांवर येऊन ठेपली असताना ही कामगिरी प्रेरणादायक असल्याचे नदालने सांगितले.
पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपान्त्य लढतीत अग्रमानांकित राफेल नदाल विरुद्ध बिगरमानांकित केरेन खाचानोव्ह अशी झुंज रंगेल. खाचानोव्हने अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात रॉबिन हॅसेचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करताना आपला दर्जा दाखवून दिला. रॉबिन हॅसेने आधीच्या फेरीत टीन स्टार डेनिस शापोव्हालोव्हचा पराभ” केला होता. परंतु खाचानोव्हविरुद्ध त्याला आज सूरच गवसला नाही.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)