टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा: स्टेफानोसचा जोकोविचला धक्‍का 

नदाल, हॅसे, सिलिच, झ्वेरेव्ह उपान्त्यपूर्व फेरीत 

टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टोरांटो: ग्रीसच्या 20 वर्षीय स्टेफानोस सित्सिपासने विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचवर तीन सेटच्या कडव्या झुंजीनंतर मात करताना टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. स्टेफानोसने जोकोविचचे आव्हान 6-3, 6-7, 6-3 असे मोडून काढताना आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक खळबळजनक विजयाची नोंद केली. 

स्टेफानोसने मास्टर्स स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे. स्टेफानोससमोर आता गतविजेत्या अलेक्‍झांडर झ्वेरेव्हचे खडतर आव्हान आहे. द्वितीय मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्हने रशियाच्या बिगरमानांकित डॅनिल मेदवेदेव्हचा केवळ 52 मिनिटांत 6-3, 6-2 असा पराभव करीत दिमाखात उपान्त्यपूर्व फेरी गाठली. 

दरम्यान अग्रमानांकित राफेल नदाल, गतविजेता अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह व सहावा मानांकित मेरिन सिलिच या मानांकितांसह रॉबिन हॅसे व कॅरेन खाचानोव्ह या बिगरमानांकितांनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. नदालने स्टॅनिस्लास वॉवरिन्काचा 7-5, 7-6 असा पराभव करताना वॉवरिन्काविरुद्धच्या आकडेवारीत 17 विजय व 3 पराभव अशी सुधारणा केली. पहिला सेट गमावल्यावर वॉवरिन्काने दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरपर्यंत झुंज दिली. परंतु नदालने दुसऱ्या मॅचपॉइंटवर विजयी गुण जिंकला. 

नदालसमोर उपान्त्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित मेरिन सिलिचचे आव्हान आहे. सिलिचने अर्जेंटिनाच्या 11 व्या मानांकित दिएगो श्‍वार्त्झमनचे आव्हान 6-3, 6-2 असे मोडून काढत आगेकूच केली. रॉबिन हॅसेने डेनिस शापोव्हालोव्हचा प्रतिकार 7-5, 6-2 असा संपुष्टात आणताना कॅरेन खाचानोव्हविरुद्धच्या उपान्त्यपूर्व लढतीची निश्‍चिती केली. खाचानोव्हने आठव्या मानांकित जॉन इस्नरला 7-6, 7-6 असे नमवीत आगेकूच केली. 

मिलोस रावनिचचे स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. फ्रॅन्सिस तियाफोने रावनिचवर 7-6, 4-6, 6-1 असा सनसनाटी विजय मिळविला. परंतु तियाफोला बल्गेरियाच्या पाचव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हकडून 6-7, 6-3, 6-7 असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. आता दिमित्रोव्हसमोर उपान्त्यपूर्व फेरीत चतुर्थ मानांकित केविन अँडरसनचे आव्हान आहे. अँडरसनने बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍काचा 7-5, 6-3 असा सहज पराभव करीत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. 

उपान्त्यपूर्व फेरीत अग्रमानांकित राफेल नदाल विरुद्ध सहावा मानांकित मेरिन सिलिच, द्वितीय मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह विरुद्ध बिगरमानांकित स्टेफानोस सित्सिपास, पाचवा मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह विरुद्ध चतुर्थ मानांकित केविन अँडरसन अशा लढती रंगतील. अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात रॉबिन हॅसे व केरेन खाचानोव्ह या बिगरमानांकितांमध्ये झुंज रंगेल. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)