‘एमएचटी-सीईटी’ अर्जासाठी उद्याची “डेडलाइन’

दि.2 ते 13 मेदरम्यान होणार परीक्षा

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या “एमएचटी-सीईटी’साठी अर्ज करण्याचा अंतिम कालावधी दि. 23 मार्चपर्यंत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

राज्य सीईटी सेलमार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. सीईटी यंदा प्रथमच ऑनलाइन होत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अंतिम मुदत दि. 23 मार्च रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे. याचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते.

आतापर्यंत 3 लाख 34 हजार अर्ज
“एमएचटी-सीईटी’साठी गतवर्षी 4 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यंदा मात्र अर्जाची संख्या कमी सद्यस्थितीत कमी दिसून येत आहे. यावर्षीच्या सीईटीसाठी दि. 21 मार्च रोजी दुपारी चारपर्यंत 3 लाख 34 हजार 830 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातील 19 हजार 7 विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत. तर 3 लाख 15 हजार 823 विद्यार्थ्यांनी अर्ज रकमेसह पूर्ण भरले आहेत.

19 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील 19 हजार 7 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, पण त्याचे शुल्क भरले नाहीत. त्यामुळे हे अर्ज कन्फर्म होऊ शकत नाही. अर्ज पूर्णपणे भरले, तर विद्यार्थी सीईटीसाठी पात्र राहतील. अपूर्ण अर्ज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना राज्य सीईटी सेलने एसएमएसद्वारे त्याबाबतच्या सूचना पाठविल्या आहेत. अर्ज नियमित शुल्कासह भरण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत आहे. अन्यथा विलंब शुल्कासह या विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागेल, अशी माहिती राज्य सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

विलंब शुल्कासह 31 मार्चपर्यंत मुदत
नियमित शुल्कात 23 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि. 24 ते 31 मार्चपर्यंत आहे. ऑनलाइनद्वारे चलन भरण्याची मुदत 3 एप्रिलपर्यंत आहे. सीईटीसाठी हॉलतिकीट दि. 25 मार्चपासून डाऊनलोड करता येतील. सीईटी परीक्षा दि. 2 मे 13 मे या कालावधीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)