टोलनाका गोळीबार प्रकरणातील चौघे जेरबंद

अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचा पुण्यातच तळ

भुईंज – सोमवार, 25 रोजी मध्यरात्री आनेवाडी टोलनाक्‍यावर पुणे येथील नामचिन गुंडांनी गोळीबार करुन टोलकर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सर्वजण फरार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. शुक्रवारी, 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या पथकाने गोळीबार प्रकरणातील चार आरोपी तसेच पळून जाण्यासाठी वापरलेली स्वीफ्ट कार ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या चारही आरोपींना अटक भुईंज पोलीस ठाण्यात आणले आहे. दरम्यान, चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असते 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आनेवाडी टोलनाक्‍यावर दि. 25 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून गोळीबार करून दहशत माजवून पोलिसांना आव्हान देत पुण्यातील नामचिन गुंडाची टोळी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन एका टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून पळाली होती. या टोळीतील चार आरोपींसह व पळून जाण्यास वापरलेली एमएच 12 एनजे 302 ही स्वीफ्ट कार पकडण्यासाठी वाईचे डीवायएसपी अजित टिके यांनी पीएसआय साळी हवलदार भैय्या ससाणे, जितेंद्र शिंदे यांचे पथक तयार करून पुणे येथे आरोपी पकडण्यासाठी 25 पासून पाठवले होते.

या पथकाने पुणे शहरासह परिसरात अनेक ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून छापे टाकून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यात यश मिळत नव्हते. तरीही या पथकातील पोलीस कर्मचारी जिद्द व चिकाटी न सोडता पुणे परिसरातील विविध गावांमध्ये सापळा लाऊन बसले होते. त्यात आज रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक कार व चार आरोपी या सापळ्यात अडकले. त्यांना ताब्यात घेऊन हे पथक पुण्याहून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्यात आणले.

अक्षय जालींदर हरबुडे (वय 24, रा. केनंद ता. हावेळी), वैभव संजय साबळे (रा. साबळेवाडी ता. खेड), विठ्ठल नामदेव वालगुडे (वय 30, रा. मार्गासनी, ता. वेल्हा), युवराज नेश्‍वर वाबळे (वय 23, रा. केसनंद, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अन्य गुन्हेगारांना पकडण्यासाठी सातारा येथील एलसीबीची दोन पथके पुणे येथे तळ ठोकून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)