शहीद सुरेश पिसाळ यांच्या पुतळ्याचे आज अनावरण

पुसेसावळी – चोराडे, ता. खटाव येथील भव्य तीन मजली शहीद स्मृती स्मारकात शहीद कमांडो सुरेश जालिंदर पिसाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवार दि. 6 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला असल्याची माहिती वीरबंधू रमेश पिसाळ यांनी दिली. माजी कमांडेड कर्नल रमण शर्मा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव, सैनिक सहकारी बॅंक चेअरमन कॅप्टन उदाजीराव निकम, कर्नल डंगवाल, सुभेदार मेजर ग्यान, माजी सैनिक संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

6 जुलै 2002 साली श्रीनगरमधील सोपीयान गावात एक घरात अतिरेकी दबा धरुन बसले होते. या अतिरेक्‍यांचा खात्मा करण्याची जबाबदारी कमांडो सुरेश पिसाळ यांच्यावर सोपविण्यात आली होती. सुरेश पिसाळ यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत अतिरेकी असलेल्या घराला वेढा दिला. रात्रीची वेळ होती. पिसाळ यांनी घराच्या दारावर लाथा मारुन दरवाजा तोडत गोळीबार केला. या गोळीबारात तीन अतिरेक्‍यांचा खात्मा झाला. मात्र, यातील एक अतिरेकी घरातील जिन्यावर लपून बसला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिसाळ हे घरात प्रवेश करताच लपून बसलेल्या अतिरेक्‍याने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पिसाळ यांना वीरमरण आले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या अतिरेक्‍याचाही खात्मा केला. तीन अतिरेक्‍यांना यमसदनी धाडून पिसाळ यांनी हा ऑपरेशन पराक्रम फत्ते केला.

शहीद सुरेश पिसाळ यांना देशसेवेचा वारसा घरातूनच मिळाला असून त्यांचे वडिल जालिंदर पिसाळ हे सैन्यदलात कॅप्टन होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. शहीद सुरेश पिसाळ हे 6 जुलै 2002 रोजी शहीद झाले. सन 2003 साली युवा पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळावी व शहीद सुरेश पिसाळ यांच्या स्मृती कायमस्वरुपी आठवणीत रहाव्या या भावनेने शहीद सुरेश पिसाळ कुटुंबीय व चोराडे गावचे ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था या सर्वांच्या सहकार्याने चोराडे गावात भव्य तीन मजली शहीद स्मृती स्मारक उभे राहिले आहे.

आज या शहीद स्मृती स्मारकात सैन्य दलातील अधिकारी, आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शहीद सुरेश पिसाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. तरी सर्व नागरिकांनी या सोहळयास उपस्थित रहावे असे आवाहन शहीद सुरेश पिसाळ चॅरीटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत चोराडे, सर्व ग्रामस्थ चोराडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शहीद सुरेश पिसाळ यांच्या स्मरणार्थ कै. कॅप्टन जालिंदर पिसाळ यांच्या संकल्पनेतून दरवर्षी शहीद दिन साजरा केला जातो. यादिवशी आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण व विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

रमेश पिसाळ, वीरबंधू 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)