भाजप संसदीय मंडळाची आज बैठक; नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड होणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य नेतृत्वात रालोआला “न भुतो, न भविष्यती’ यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपने उद्या सायंकाळी रालोआ संसदीय मंडळाची बैठक बोलाविली असून यात नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाईल.

17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार निवडून आले आहेत. तर, संपुआच्या खात्यात 82 जागा गेल्या आहेत. सपा-बसपा आघाडीचे 15 खासदार निवडून आले आहेत. यामुळे भाजपचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेवून 16 वी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली. थोडक्‍यात, नवीन सरकार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन सरकारचे स्वरूप, रालोआतील घटक पक्षांना मंत्रिमंडळात दिले जाणारे स्थान अशा विविध मुद्यावर दिल्लीत चर्चा रंगली आहे. मोदी सरकारचा खजिना कोण सांभाळणार? भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल काय? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत.

दरम्यान, भाजपला पश्‍चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे. अशात बंगालमधील चार खासदारांना मंत्रिमंडळात सामील केले जाईल, अशी चर्चा आहे. 2021 मध्ये बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे.
भाजपने नवनियुक्त सर्व खासदारांना उद्या दिल्लीला बोलाविले असून ते संसदीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)