आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार आज बुधवारी सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. चालू आर्थिक वर्षात सादर झालेल्या तब्बल 36 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आणि सरकारच्या डोक्‍यावर असलेले सुमारे पाच लाख कोटीचे कर्ज यामुळे अर्थसंकल्पात मोठी घोषणा अपेक्षित नाही. मात्र आगामी निवडणूक पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर मदतीची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे.

येत्या एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या दुपारी दोन वाजता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी आज मुनगंटीवार व केसरकर यांनी अंतरिम अर्थसंकल्पावरून अखेरचा हात फिरवला. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, सचिव (व्यय) राजीव मित्तल उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 अशा चार महिन्यांसाठी लागणाऱ्या आवश्‍यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज, लोकसभा निवडणूक खर्चाचा समावेश आहे. याशिवाय सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (2004), दिलीप वळसे-पाटील (2009) आणि अजित पवार (2014) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)