चौथ्या विजयासाठी न्यूझीलंड उत्सुक; चाहत्यांना धावांच्या पावसाची प्रतिक्षा
स्थळ – नॉटिंगहॅम
वेळ- दुपारी 3 वाजता
नॉटिंगहॅम – शतकवीर शिखर धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरूध्द सलामीच्या जोडीत के.एल.राहुल हा रोहित शर्मा कितपत साथ देईल याचीच चिंता भारतीय संघ व्यवस्थापनास निर्माण झाली आहे. सलग चौथा विजय नोंदविण्याच्या न्यूझीलंडच्या मार्गात पावसाचा अडथळा असणार आहे. चाहत्यांना मात्र धावांचा पाऊस पडावा असेच वाटत आहे.
दुखापातीमुळे आणखी तीन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रिषभ पंत याला इंग्लंडला पाठविण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला असला तरी तो आज व रविवारी होणाऱ्या सामन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही . साहजिकच धवनच्या अनुपस्थितीत राहुल याला संधी मिळणार आहे. राहुल हा जरी सलामीचा फलंदाज असला तरी धवन व शर्मा यांच्याइतके यश नवीन जोडी मिळविणार की नाही याचीच साशंकता आहे.
धवन व शर्मा यांनी सलामीस आतापर्यंत 4 हजार 681 धावा केल्या आहेत. राहुल याला सलामीस पाठविले तर संघात विजय शंकर व दिनेश कार्तिक यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर केदार जाधवला वगळले जाण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टी वेगवान व उसळत्या गोलंदाजीस पोषक आहे. हीदेखील शंकरला संधी देण्यासाठी जमेची बाजू असणार आहे.
सलामीसाठी आपण योग्य पर्याय आहोत हे सिध्द करण्यासाठी राहुल उत्सुक झाला आहे. त्याचा वरीष्ठ सहकारी शर्मा याने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. शतक व त्यापाठोपाठ अर्धशतक टोलवित त्याने संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कसे आक्रमक पवित्रा ठेवीत सामोरे जायचे याचा परिपाठ त्याने दिला आहे. न्यूझीलंडकडे अनुभवी व आक्रमक फलंदाजांची भरभक्कम फळी आहे हे लक्षात घेऊनच भारतीय गोलंदाजांना रणवीती आखावी लागणार आहे.
कर्णधार केन विल्यमसन याने आतापर्यंत संघाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. लागोपाठ तीन सामने त्याच्या संघाने जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताविरूध्द त्यांचेच पारडे जड राहिले आहे. तरीही भारताने नुकताच ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळविल्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळविणे सोपे नाही याची जाणीव न्यूझीलंडला असणार आहे. त्यामुळेच त्यांना आजची लढत गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने ट्रेंट बोल्ट् व लॉकी फर्ग्युसन यांच्यावर आहे. या दोन्ही गोलंदाजांनी येथील अनुकुल वातावरणाचा लाभ घेत प्रभावी वेगवान मारा केला आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, शिखर धवन.
न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.