मुंबई पुरमुक्तीसाठी भुयारी मार्गाने समुद्रात पाणी सोडणार 

मुंबई: पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी भुयारी मार्गाने पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर जागोजागी साठणारे पावसाचे पाणी 30 मीटर खोल भुयारात जमा करुन माहुल येथील प्रस्तावित उदंचन केंद्राद्वारे समुद्रात सोडण्याचा विचार सरकारपातळीवरून सुरु आहे.
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक पातळीवर पूरनियंत्रणाचे काम यशस्वीपणे करणाऱ्या तज्ज्ञांची एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबईत अतिवृष्टीमुळे जागोजागी तुंबणाऱ्या पाण्याचा विचार करण्यात आला. कमी वेळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईत काही ठिकाणी काही वेळासाठी पूरसदृश स्थिती निर्माण होऊन वाहतुकीला व पादचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.
परळ नाक्‍यातून शिव चौकापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर पावसाळ्यादरम्यान जलमय होतो. हा भूभाग समुद्राच्या पातळीपेक्षा एक मिटरहून अधिक सखोल आहे. त्यामुळे जमलेले पावसाचे पाणी लगेच समुद्रात वाहून जात नाही. त्यातही एका तासात 50 मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आणि तीच वेळ समुद्राच्या भरतीची असेल तर पाणी जमिनीवर, रस्त्यांवर तुंबून राहते. या परिस्थितीतून सुटका व्हावी यासाठी महापालिका गांभीर्याने उपाय शोधत आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस बॅंकॉक येथे 2011 मध्ये आलेल्या पूरसंकटावर मात करणारी कायमस्वरूपी योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई मनपाचे उपायुक्त सुधीर नाईक व पर्जन्यजल वाहिन्या विभागाचे उपमुख्य अभियंता प्रमोद खेडकर आदि उपस्थित होते. आता महापालिकेने सल्लागारांची नियुक्ती करून प्रकल्प अहवाल तयार करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत दिले. योग्य नियोजन आणि उपाययोजना यामुळे मुंबई लवकरच पूरमुक्त होईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)