मुख्यमंत्र्यांना भेटायला लाँगमार्च करत चालत निघणार

आंदोलनाचे सातव्या दिवशी प्रकल्पग्रस्त युवकांचा निर्धार

नवारस्ता  – महाराष्ट्राला वरदान ठरलेला शिवसागर प्रकल्पग्रस्तांसाठी शाप ठरतोय की काय? अशी भावना प्रकल्पग्रस्तांच्या तिसर्‍या आणि चौथ्या पिढीला होऊ लागली आहे. त्यामुळे ही पिढी प्रशासनावर कमालीची नाराज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठाम अंमलबजावणी शिवाय आंदोलनातून उठणारच नाही. तर लाँगमार्च करत मुख्यमंत्र्यांना भेटायला चालत निघणार असल्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त युवकांनी आंदोलनाच्या सातव्या दिवशी केला.

सन 1952 ते 1960 च्या दशकात कोयना प्रकल्पाची सुरुवात होऊन प्रकल्प पूर्णत्वास गेला. दर्‍याखोर्‍यात 54 किमी परिसरात पाणीसाठा असणारा शिवसागर महाराष्ट्राला वरदान तर ठरलाच. पण शेती, ओद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राला स्वयंपूर्णतेकडे नेणारा हा प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी मात्र शाप ठरला. 40 रुपये प्रति एकर दराने सुमारे चार हजार शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या. यामध्ये 105 गावे बाधित झाली. यावेळी सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, रायगड जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे ठरवून शासनाने केवळ आश्वासने देत प्रकल्पग्रस्तांच्या माथी पुनर्वसन हा शिक्का कायमचा मारुन ठेवला.

कोयना प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना 64 वर्ष आपल्या मागण्यांसाठी झगडावे लागत असेल तर ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. अधिकारी, कर्मचारी, राजकीय प्रतिनिधी यापैकी प्रकल्पग्रस्तांचा कोणीही वाली नाही. मात्र 64 वर्षांनंतर कोयना प्रकल्पग्रस्तांची तिसरी व चौथी पिढी पेटून उठली आहे. आमचे हक्क आम्हाला द्या, आम्हाला तुमची भीक नको. महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणार्‍या कोयना प्रकल्पाचे आम्ही वारसदार आहोत, या निश्चयाने आणि कमालीच्या जिद्दीने ही पिढी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात उतरली आहे. दरम्यान, आज आंदोलनाचा सातवा दिवस असून आंदोलकांनी कोयनानगर येथील सिंचन भवनावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संजय लाड, महेश शेलार, सचिन कदम, विठ्ठल संकपाळ, सीताराम पवार, दाजी पाटील यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)