भाजीमंडईसाठी आरक्षित जागा विकसित करणार

कराड -भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मलकापूर भाजीमंडईसाठी आरक्षित जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी 1 कोटीच्या प्रस्तावांसह 65 लाखांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीलम येडगे होत्या.

सभेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या 44 लाख 8 हजार 379 रुपये फंडातून प्रभाग आठमध्ये इंद्रप्रस्थ कॉलनीतील 2 रस्ते, प्रभाग नऊ मधील 1, प्रभाग एक मधील 1 अशा चार रस्त्यांच्या विकासकामास मंजूरी देऊन काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रभाग पाच मधील बागलवस्ती 5 वी गल्ली ते मलशुद्धीकरण केंद्र, प्रभाग तीन मधील मुख्याधिकारी निवासस्थान ते नियोजित भाजीमंडई व प्रभाग नऊ मधील जगदाळे मळा ते पीरदर्गा या तीन रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक कोटीचे प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.

मलकापुरातील भाजीमंडईच्या विषयावर चर्चा सुरू असताना राजतारा हॉटेल जवळील जागा भाडेतत्वावर घेणे किंवा येडगे यांची आरक्षित भाजीमंडईची जागा विकसित करणे यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यता आली. यावेळी भाडे तत्त्वावर जागा घेण्याऐवजी पालिकेची स्वत:ची आरक्षित जागाच विकसित करावी अशी सूचना नगरसेवकांनी मांडल्या.

नगरपालिकेने विकसित केलेल्या भाजीमंडईत प्रथम शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे व जागा शिल्लक राहिली तरच व्यावसायिक विक्रेत्यांना जागा द्यावी, असे सांगितले. त्याचबरोबर स्वच्छ, सुंदर व हरित मलकापूर अंतर्गत 1 ते 8 जुलै हा वृक्षारोपन सप्ताह साजरा करण्याचा ठराव केला. या सप्ताहात 2 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)