नवीदिल्ली – टाईम या जगप्रसिद्ध मासिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कव्हर स्टोरी करून त्यात मोदींना भारताचे विघटनकारी नेते अशी उपमा दिली आहे. त्यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज या संबंधात एका पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की मोदींची प्रतिमा मलिन करण्याच्या इराद्यानेच हा मजकूर छापण्यात आला असून त्या मागे लेखकाचा पाकिस्तान धार्जिणा अजेंडाच दिसून येत आहे. या मासिकाने कव्हरवर मोदींची फोटो छापून त्या खाली भारताचा विभाजन प्रमुख अशी टिपण्णी केली आहे.
या मासिकातील लेख अतिश तसीर नावाच्या पत्रकाराने लिहीला असून ते भारतातील पत्रकार तवलीनसिंग आणि दिवंगत पाकिस्तानी व्यावसायिक सलमान तसीर यांचे पुत्र आहेत. बात्रा म्हणाले की अनेक आंतरराष्ट्रीय मासिकांनी सन 2014 मध्येही मोदींच्या विरोधात असेच विखारी लिखाण केले होते. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीची यादीही बात्रा यांनी यावेळी वाचून दाखवली. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने बरीच प्रगती केली असून विकास आणि बदलाचा अजेंडा मोदी सरकारने राबवला आहे असे ते म्हणाले.
सध्या कॉंग्रेस नेते नवज्योत सिद्ध हे ठिकठिकाणच्या प्रसार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करीत आहे त्यांच्या प्रचार शेैलीवरही बात्रा यांनी यावेळी आक्षेप घेतला. ते म्हणाले की सिद्धु यांची प्रचारशैली वंशद्वेषी व सवंग आहे. सिद्धु अत्यंत खालच्या पातळीवर सवंग प्रचार करीत आहेत पण सॅम पित्रोदा यांनी 84 च्या शिख दंगली बाबत हुआ तो हुआ असे जे विधान केले आहे त्यावर मात्र सिद्धु काही का बोलत नाहींत असा सवाल त्यांनी केला.