नीरा नरसिंहपूर – जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरचा एक दिवसाचा मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी सराटी (ता. इंदापूर) येथे शनिवार 6 जूलैला येत आहे. त्यानिमित्त लाखो वैष्णवांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ सज्ज असल्याचे जिल्हा बॅकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व सरपंच बापूसाहेब कोकाटे यांनी सांगितले. तत्पूर्वी दुपारच्या विसाव्यातील स्वागतासाठी बावडानगरीही सज्ज झाली आहे.
तुकाराम महाराज पालखीचा सराटी येथील पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आहे. पालखी स्थळाचे कॉंक्रीटीकरणाच्या शेजारी झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची सोय, फिरते शौचालय युनिट, आरोग्याच्या दृष्कीकोनातून स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवले आहे. गावाच्या प्रवेशावेळी स्वागत कमानी उभारल्या आहेत. रात्रीच्या मुक्कामासाठी ज्या ज्या म्हणून सुविधा लागतात त्या जादा प्रमाणात पुरविण्यात आले आहेत. पालखी इंदापूरातून सराटी मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्यानंतर इंदापूर-अकलूज मार्गावर गोखळी, वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती येथे पालखीचे स्वागत करण्यात येते. दुपारच्या विसाव्यासाठी बावडा येथील बाजारतळावर भक्तांच्या दर्शनासाठी सभामंडप उभारला आहे.