वाघाची बछडी अखेर पर्यटकांच्या भेटीला

चार पिल्लांच्या दर्शनाने पर्यंटक भारावले : सायंकाळी पिंजऱ्यात परतण्यास मात्र नकार!

पुणे, दि.28 – कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या दर्शनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही चारही बछडी रविवारपासून पर्यंटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली, अशी माहिती कात्रज प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. ही बछडी खंदाकात सोडण्यापूर्वी त्यांची आवश्‍यक शारीरिक आणि सुरक्षेसाठी खंदकाची तपासणी करून ती खुली करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कात्रज प्राणीसंग्रहालयातील “बगिराम’ आणि “रिद्धी’ या वाघाच्या जोडप्यास ऑक्‍टोबरमध्ये 4 गोंडस पिल्ले झाली. त्यात 3 नर, तर 1 मादी जातीचे आहे. महापौर मुक्ता टिळक याच्या उपस्थितीत या गोंडस बछड्यांचे “पौर्णिमा’, “सार्थक’, “आकाश’, “गुरू’ अशी नावे ठेवण्यात आली आहे. या नामकरण सोहळ्यानंतर प्राणी संग्रहालयात शनिवारी आणि रविवारी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही बछडी अद्याप नागरिकांना पाहण्यासाठी खंदकात न सोडता पिंजऱ्यातच ठेवण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शन होत नव्हते. तर प्राणीसंग्रहालयात वाघांसाठी महापालिका प्रशासनाने बनविलेले खंदक “मोल्ड’ पद्धतीचे असून ते सुमारे चार ते पाच फूट खोल आहे. या खंदकात पाणी आहे. त्यामुळे पिंजऱ्याबाहेर हे बछडे सोडल्यास या खंदकात पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या बछड्यांची उंची, त्यांची शारीरिक क्षमता या बाबी लक्षात घेऊन त्यांना पिंजऱ्यातून बाहेर सोडले जाणार होते.

दरम्यान, दिवसभर खंदकात फिरल्यानंतर सायंकाळी पिंजऱ्यात परत जाण्यास ही बछडी नकार देत होती. अखेर येथील सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना पुन्हा पिंजऱ्यात सोडण्यात आले.

पहिला दिवस लाजरा-बुजराच
या चारही वाघांचा पहिला दिवस लाजरा-बुजराच असल्याचे दिसून आले. जवळपास सहा महिने एकाच पिंजऱ्यात बंद असलेले हे बछडे पहिल्यांदाच बाहेर आले. त्यामुळे ते आसपासच्या वातावरणाचा अंदाज घेत होते. तर ही चारही बछडी दोन्ही वाघांच्या आसपासच घुटमळताना दिसून आली. त्यातच उन्हाचा चटका मोठा असल्याने या बछड्यांनी बराच वेळ खंदकातच राहणे पसंत केले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. तर, तर ज्यांना या बछड्यांचे दर्शन झाले ते पर्यंटक भारावून गेल्याचे पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)