थायराॅईडवर नियंत्रण कस कराल (भाग 1)

-डाॅ.एस.एल.शहाणे

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्‍टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख.

कर्करोग, क्षयरोग या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती दिसून येते. मात्र थायरॉइड या आजाराविषयी लोकांमध्ये म्हणावी तितकी जागृती दिसून येत नाही. थायरॉइड हा आजार दोन प्रकारचा असतो. हायपर थायरॉइड आणि हायपो थायरॉइड. आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथी म्हणजे थायरॉइड. या ग्रंथी शरीरात मानेखालच्या भागात असतात. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो.

या ग्रंथीतून T3 आणि T4 या संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते. शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यावर शरीरातील मेटॅबॉलिझम वाढतं. म्हणजे हृदयाची धडधड वाढते, डोळे मोठे होतात, हाताला घाम सुटतो. मेटॅबॉलिझमचा परिणाम शरीरातील हाडं किंवा हृदयावर होऊ शकतो. हार्मोन्सचं प्रमाण कमी झाल्यास उलट परिणाम होतात.

आयोडिन हे खनिज थायरॉइड ग्रंथीसाठी उपकारक समजलं जातं. थायरॉइड ग्रंथीचं कार्य, वाढ तसंच मेंदू आणि शरीर यांचा एकूण विकास करण्यासाठी या खनिजाचा उपयोग होतो. थायरॉइड ग्रंथींतून स्त्रवणाऱ्या संप्रेरकांमुळे शरीराचं तापमान मर्यादित ठेवलं जातं. रक्तपेशी निर्माण होतात. प्रजोत्पादनासाठी आवश्‍यक पेशींचं आरोग्य सुधारतं. तसंच स्नायू आणि नसांना बळकटी प्राप्त होते.

हायपोथायरॉइड (थायरॉइड या अंत:स्त्रावी ग्रंथीचं काम कमी होतं.) या आजाराचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दिवसाआड किमान एक ते दोन रुग्णांमध्ये या आजाराची किंवा यातल्या काही लक्षणांची सुरुवात दिसतेच. ओळखीच्या चार ते पाच कुटुंबांपैकी एका कुटुंबामध्ये एखादा तरी हायपो थायरॉइडचा रुग्ण दिसून येतो. कित्येक रुग्ण तर वाढत चाललेल्या वजनामुळे त्रस्त होऊन डॉक्‍टरांकडे येतात. रक्त तपासणी केल्यानंतर हायपो थायरॉइडचं निदान होतं.

हायपोथायरॉइडमध्ये खालील लक्षणं दिसून येतात

-वजन अकारण आणि अवास्तव वाढतं.
-लवकर थकवा येतो.
-कुठल्याही कामात निरुत्साह वाटतो.
-अंगावर जास्त करून हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.
-सांधेदुखीची समस्या वाढते.
-त्वचा सुरकुतते. कोरडी पडते.
-हाता-पायांच्या बोटांवरची नखं चपटी आणि खडबडीत होतात.
-केस रुक्ष (कोरडे) होतात. जास्त प्रमाणात गळायला लागतात. लवकर पिकतात.
-पोट साफ राहत नाही. (कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.)
-स्नायूंमध्ये पेटके येतात. (क्रॅम्प्स येणं)
-कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
-डिप्रेशन येतं
-आवाजात घोगरेपणा वाढतो
-स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या तक्रारी

यांसारखी लक्षणं हायपोथायरॉइड या आजारात दिसतात. सबक्‍लिनिकल हायपोथायरॉइड म्हणजे ज्यात लक्षणं दिसू लागतात, पण रक्तात ढडक (थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स), T3, T4 या संप्रेरकांची पातळी सर्वसामन्य असते. मात्र कालांतराने TSH वाढलेलं आढळतं.

आयोडिनची कमतरता निर्माण झाली की, थायरॉइडचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीभोवती थायरॉक्‍झीनची मागणी करणाऱ्या शरीरातल्या रसायनांचा जमाव वाढतो. थायरॉइड ग्रंथींना सूज येते. शरीराच्या अन्य क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यांचे रक्ताचे रिपोर्ट्‌स सुरुवातीला सर्वसामान्य (नॉर्मल) असतात, त्यांना इतर डॉक्‍टरांनी थकव्यासाठी केवळ टॉनिक किंवा अंगावर सूज असेल तर ती कमी करणारी औषधं दिलेली असतात.

पण मूळ आजार त्यामुळे बरा होतच नाही. तसंच रुग्णालाही म्हणावा तितका फरक वाटत नाही. अशा पेशंट्‌समध्ये रिपोर्ट्‌स नॉर्मल असतानाही जर हायपो थायरॉइड या आजाराची लक्षणं 60 ते 70 टक्के दिसत असतील (सबक्‍लिनिकल हायपोथायरॉईड) तर त्या अनुषंगाने औषधं सुरू केल्यावर लगेच फरक दिसून येतो.

थायराॅईडवर नियंत्रण कस कराल (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)