भोसरी पोलिसांत गुन्हा; पाच आरोपी फरार
पिंपरी – भोसरी पोलिसांनी दापोडी येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन महिलांची सुटका केली असून या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी रेणू रमेश भाटिया (वय, 63 रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (वय, 25 रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (वय, 27 रा. थेरगाव मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (वय, 25 रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (वय, 35 रा. रहाटणी मूळ रा. बीड) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील मंत्री निकेतन येथील एका घरामध्ये तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून तीन महिलांची सुटका केली. तसेच, पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.