पणजी – गोव्यातील दहा कॉंग्रेस आमदारांनी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यापैकी तीन जणांचा आज राज्यमंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज एकूण चार जणांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले. विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांचा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
या नवीन सदस्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉर्वर्ड पाटीच्या तीन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. तथापी आम्ही राजीनामे देणार नाही आम्हाला मंत्रिमंडळातून बडतर्फ करा अशी भूमिका या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतल्यानंतर काहींसा राजकीय तणाव निर्माण झाला होता. गोवा फॉवर्ड पक्षाने भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर यावेळी जोरदार टीका केली.