नवी मुंबईत आढळलेल्या टाईम बॉम्बप्रकरणी तिघांना अटक 

अजून एक जिवंत बॉम्ब हस्तगत 
मुंबई – नवी मुंबईतल्या कळंबोळी येथील सुधागड शाळेबाहेर सापडलेल्या टाईम बॉम्बप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांकडून अजून एक जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये अमोनिया नायट्रेट आणि जिलेटीनचा वापर करण्यात आला होता.

बिल्डरला धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जाणार होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. पुणे येथे राहणारा सुशील साठे, तर नवी मुंबईतील उलवे येथे राहणारे मनीष भगत आणि दीपक दांडेकर या तिघांनी हा बॉम्ब तयार केला होता. बॉम्ब बनवून 17 जून रोजी सुधागड हायस्कुलजवळ हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस हा बॉम्ब निकामी करण्यासाठी एमआयडीसीत घेऊन गेले. त्यादरम्यान या बॉम्बचा स्फोट झाला.

अटक केलेल्या तीन्ही आरोपींवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. पैसे मिळवण्यासाठी हे तिघेजण एका बिल्डरच्या घराजवळ बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. त्यानंतर उर्वरित बॉम्बचे घरावर स्फोट घडवून आणण्याची धमकी देऊन बिल्डरकडून 2 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न या तिन्ही आरोपींचा होता.

दरम्यान, दीपक दांडेकर याची दगडखाण असल्याने या आरोपीला बॉम्ब बनवण्याचे तंत्र अवगत आहे. परंतु बॉम्बस्फोटाची वेळ जुळवता आली नसल्याने स्फोट होऊ शकला नाही. हे तीनही आरोपी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबधित नसल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here