श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. चकमकीवेळी क्रॉसफायरिंगमध्ये सापडून एका स्थानिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
श्रीनगरच्या बटमालू भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यामुळे बुधवारची मध्यरात्र झाल्यानंतर सुरक्षा जवानांनी मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला जवानांनी घेरले. दहशतवाद्यांना प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, ते नाकारून त्यांनी गोळीबार सुरू केला.
त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये सुरुवातीला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान जखमी झाले. त्यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. मारले गेलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरचे रहिवासी होते. चालू वर्षात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात 72 मोहिमा राबवल्या. त्यामध्ये 177 दहशतवादी मारले गेले. खात्मा झालेल्यांत 22 पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांकडून राबवल्या जाणाऱ्या धडक मोहिमांमुळे दहशतवादी संघटनांना जबर दणका बसला आहे.