पुणे – मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तीन विद्यार्थी आज सकाळी धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापैकी दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण २२ वर्षांचे होते. दरम्यान, एका तरूणीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून, अन्य दोन तरुणांचा शोध सुरु आहे. हे सर्व भारती विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र्र दिनानिमित्त सुटी असल्यामुळे भारती विद्यापीठात एमबीएचं शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी-विद्यार्थिनी मुळशी धरण परिसरात पिकनिकला आले होते. ही सर्व मुलं त्यांच्या ग्रुपसह येथे मुक्कामी होते. सकाळी हे सर्व धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले. मात्र, धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.