मुंबई- धावत्या कारच्या दरवाजात बसून कारच्या टपावर हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या प्रकाराकडे एका ट्विटद्वारे मुंबई पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समजते.
काही दिवसांपूर्वी एका ट्विटर युजरने मुंबई पोलिसांना टॅग करत व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत कारमधील दोघेजण दरवाजात बसून कारच्या टपाचे टेबल करुन गप्पा मारत होते. यातील एका व्यक्तीच्या हातात बाटलीही दिसत होती.
त्यामुळे अशा बेजबाबदार आणि अपघाताला आमंत्रण देणारे असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. वांद्रे येथील कार्टर रोडवरील दृष्य असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या व्हिडिओनंतर खार पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत तिघांना अटक केली. या तिघांवर आयपीसी 279, 336 आणि 184 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.